जयसिंगपूर स्वीकृत नगरसेवकपदी डांगे, आडगाणे यांची निवड

  जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सामाजिक कार्यकर्ते सागर आडगाणे व पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती मुसा डांगे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्या अध्यक्षतेखालील ऑनलाईन सभेत या निवडी पार पडल्या.

  जेष्ठ नगरसेवक संभाजी मोरे आणि गुंडाप्पा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया झाली. २०१० मध्ये डांगे यांनी नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. काँग्रेसचे नेते, दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे.

  सागर आडगाणे यांना गेल्या दोन-तीन वेळा स्विकृत नगरसेवकपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, नेत्यांनी शब्द पाळल्याने शनिवारी आडगाणे यांना विजयाचा गुलाल लागला. त्यांच्या मातोश्री सरोजिनी आडगाणे या २००५ साली नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी महिला बालकल्याण, नियोजन, आरोग्य अशा विभागांच्या सभापतीपदाची धुरा सांभाळली होती.

  आडगाणे यांनी रोटरीच्या माध्यमातून विविध कामे केली आहेत. स्मशानभूमी नूतनीकरण, राजीव नगरमध्ये बालवाडी, छत्रपती शिवाजी हॉलसाठी केलेले कार्य संसमरणीय ठरले आहे. निवडीनंतर डांगे व आडगाणे यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

  सख्खे भाऊ एकाच वेळी सभागृहात

  मुसा डांगे यांचे बंधू युनूस डांगे विद्यमान नगरसेवक आहेत. ते दुसऱ्यांदा नेतृत्व करत आहेत. तर मुसा डांगे याना स्वीकृतपदी संधी मिळाल्याने एकाच घरातील दोन सख्खे भाऊ एकाच एकाच वेळी नगरसेवक होण्याचा मानही डांगे कुटुंबाला मिळाला आहे.