कोरोना काळात जीवाचे रान करून दिली सेवा; आता त्याच कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी नर्सेस (एएनएम) दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत. कोरोना काळात त्यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी दिवसरात्र काम केले आहे.

  जयसिंगपूर : कोविडच्या काळात दिवस रात्र काम करून जनतेची सेवा करणाऱ्या एएनएम नर्सेसची सेवा समाप्त करण्यात आली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत राज्यातील तब्बल ५९७ कंत्राटी नर्सेसच्या (एएनएम) नोकरीवर गदा आली आहे. त्यांची सेवा ३१ ऑगस्टनंतर रद्द केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३९ नर्सेसचा त्यात समावेश आहे. एकंदरीत दहा ते पंधरा वर्षे सेवा करून ऐनवेळी उचलबांगडी केल्याने आरोग्य यंत्रणेत कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी नर्सेस (एएनएम) दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत. कोरोना काळात त्यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी दिवसरात्र काम केले आहे. त्यांना वेळेवर पगार तर दिलाच नाही परंतु आता त्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात ५९७ पदांना मंजुरी व वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे ५९७ पदांना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  रिक्त पदे रद्द करूनही रद्द करावयाची पदे शिल्लक असल्यास एक वर्षांत एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची पदे रद्द करावीत, एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्राची संख्या रद्द होणाऱ्या पदापेक्षा जास्त असल्यास २०११ च्या जनगणनेनुसार यादी तयार करावी, त्यातील कमीत कमी लोकसंख्या असलेल्या उपकेंद्राची पदे रद्द करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

  आता जर त्या नर्सेसना एएनएमला काम करण्याची इच्छा असेल तर अर्ज करावा लागणार आहे. समुपदेशनाने रिक्त पदे भरण्यात येतील. दहा सप्टेंबरपर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करून विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक सेवाज्येष्ठतेनुसार राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान अंतर्गत नेमणूक देतील.

  जिल्हानिहाय कमी केलेली संख्या : 

  ठाणे – ३, रायगड – 21, पालघर – १, नाशिक – १०, जळगाव -19, अहमदनगर – 29, पुणे – 19, सोलापूर – 39, सातारा – 29, कोल्हापूर – 39, सांगली – 23, सिंधुदर्ग – 21, रत्नागिरी – 19, औरंगाबाद – ८, जालना – १०, हिंगोली – 12, परभणी – 19, लातूर – 22, उस्मानाबाद – 16, बीड – 30, नांदेड – 37, अकोला – 13, अमरावती – 13, बुलडाणा – 24, वाशीम – 9, यवतमाळ – 21, नागपूर – 24, वर्धा – 22, भंडारा – 11, चंद्रपूर – 11 अशी आहेत.