कोल्हापूरमध्ये दरवर्षी दिसणारं हे चित्र यंदा मात्र दिसणार नाही.
कोल्हापूरमध्ये दरवर्षी दिसणारं हे चित्र यंदा मात्र दिसणार नाही.

दसऱ्याचं सोनं लुटण्यासाठी होणारी ती गर्दी, तो जल्लोष, ती झुंबड, तो उत्साह, रस्तोरस्ती दुतर्फी उसळणारी गर्दी, चौकाचौकात जमणारे मित्रमंडळींचे गट, एकमेकांना मारल्या जाणाऱ्या मिठ्या, ज्येष्ठांचे पाय पकडून घेतले जाणारे आशीर्वाद यातलं काहीच यंदा कोल्हापुरात दिसणार नाही.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला संस्थानकाळापासूनची मोठी परंपरा आहे. कोल्हापूरची ही परंपरा शाही घराण्यासोबत करवीरवासीयांनीसुद्धा अखंडित सुरू ठेवून राजघराण्याशी ऋणानुबंध जपले आहेत. मात्र या अखंडित परंपरेला यावर्षी  कोरोनाची जणू नजरच लागली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वतः श्रीमंत शाहू महाराजांनी करवीरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी  मोठा निर्णय घेतला आणि यंदाचा दसरा चौकातील शाही दसरा रद्द केल्याची घोषणा केली.

यंदा हा थाट असणार नाही. प्रत्येकाने आपापल्या घरीच दसरा साजरा करावा, असं आवाहन करण्यात आलंय.

ऐतिहासिक दसरा चौकात यावर्षी राजघराण्यातील वारसांनी शमीपूजन केल्यानंतर लकडकोट आणि पोलिसांच्या बंदोबस्ताला झुगारून सीमोल्लंघन करत आपट्याच्या वृक्षाची अर्थात शमी वृक्षांची पाने “दसऱ्याचं सोनं” म्हणून लुटून नेण्यासाठी तुटून पडणारे करवीरवासीय यंदा दिसणार नाहीत. त्याचबरोबर करवीर संस्थानाच्या शाही छत्रपती घराण्यातील सदस्यांनासुद्धा शुभेच्छा देण्यासाठी बंधने येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरवासीय यंदा प्रथमच नाराज दिसत आहेत.

प्लेगच्या साथीत शाही दसरा रद्द करण्यात आल्याचे ऐतिहासिक संदर्भ

शंभर वर्षांपूर्वी कोल्हापुरात फोफावलेल्या प्लेगच्या साथीमुळे कोल्हापुरात शाही दसरा रद्द करण्यात आल्याचे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर इतिहासात त्याचे संदर्भ सुद्धा आढळतात. करवीर संस्थानातील प्रजेला आणि त्यांच्या आरोग्याला, जीविताला प्राधान्य देत दसऱ्याचा सोहळा त्यावेळी रद्द करण्यात आला होता.

करवीर वासीयांनी आपल्या घरी राहूनच विजयादशमी साजरी करावी असे आवाहन कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी केले आहे.पुढील वर्षी जोशात शाही दसरा साजरा करू असा विश्वास सुद्धा त्यांनी कोल्हापूरच्या जनतेला दिला आहे.