पडत्या पावसात हाताला लावलेली सलाईन घेऊन शिवसेनेचे तरुण खासदार मराठा मोर्च्यात सहभागी

खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अशक्तपणा असल्याने ते घरात उपचार घेत होते. १० दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रकृती नाजूक असतानाही ते सलाईन लावून सहभागी झाले.

    कोल्हापूर: खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली आज पासून मराठा आरक्षणासाठी पहिल्या मराठा मोर्चा कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून मराठा समाजाचे राजकीय नेते या मोर्च्यात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने चक्क सलाईन लावलेला हात घेऊन मराठा मोर्चात सहभागी झाले. इतकेच नव्हे तर माने यांनी मोर्च्याच्या ठिकाणी भाषणही केले.
    “आरक्षण कोणामुळे थांबलं? आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? असे प्रश्न समाजाला पडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन” अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

    खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अशक्तपणा असल्याने ते घरात उपचार घेत होते. १० दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रकृती नाजूक असतानाही ते सलाईन लावून सहभागी झाले. कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. मोठ्या पावसातही हा मराठा मोर्चा निघत आहे. मानेही पावसाची पर्वा न करता मोर्चात सहभागी झाले.

    “महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे” असा विश्वास शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

    या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.