संभाजीराजेंच्या नेतृत्वात कोल्हापुरात राजर्षी शाहू समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात; ॲड प्रकाश आंबेडकर आंदोलनात राहणार उपस्थित

संभाजीराजेंच्या नेतृत्वातील 'मराठा क्रांती मूक आंदोलनात' वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे, त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.

    कोल्हापूर:  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या खासदार  छत्रपती संभाजीराजेंनी जाहीर केलेल्या मूक आंदोलनाची सुरूवात उद्या (१६ जूनपासून) होणार आहे. त्यापूर्वी आज संभाजीराजे यांनी राजर्षी शाहू समाधीस्थळावरुन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि आंदोलनाचा आढावा घेतला.

    रोज एक, पाच जिल्ह्यात मूक आंदोलन
    यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होताना कोरोना नियमांचे पालन करुन शांतपणे आंदोलन करु. ते म्हणाले की, आंदोलना दरम्यान कोणीही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा,’ असेही ते म्हणाले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत उपोषण होणार असून कोल्हापूरात आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पुढे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे ५ जिल्ह्यात मूक आंदोलन होईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार व तेथील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येईल. आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत,’ असे आवाहनही संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना केले आहे.

    ॲड प्रकाश आंबेडकर ‘मराठा क्रांती मूक’ आंदोलनात सहभागी होणार

    दुसरीकडे ॲड प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वातील ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे, त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत. अनेक अर्थांनी हा पाठिंबा अभूतपूर्व असणार आहे.