आरक्षणासाठी मराठा समाजाचे कोल्हापूरात मूक आंदोलन

  कोल्हापूर/ दीपक घाटगे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मूक आंदोलन करण्यात आले. १ जुलैपर्यंत शासनाने आपली भूमिका जाहीर न केल्यास मुंबईत लाँग मार्च काढण्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी यावेळी दिला. सकाळी ११ वाजता भरपावसात आंदोलक आले होते.

  समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारचीही आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या भूमिकेवर समाज ठाम असून, या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलते करण्याचे आंदोलन समाजाने छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वातखाली आज केले. यावेळी मंत्री हसन मुशीफ, सतेज पाटील यांनी शासनाची काय भूमिका आहे ते सांगितले.

  या आंदोलनाचे रणशिंग कोल्हापुरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू समाधी स्थळावरून फुंकण्यात आले. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील जिल्ह्यामधून हे आंदोलक आले होते. कोल्हापुरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे. नाशिक, संभाजी नगर, अमरावती आणि कोकण असे पाहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहेत. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुणे लाल महाल ते मुंबई विधान भवन लाँग मार्च काढण्याचा इशारा यावेळी दिला. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनानंतर लाँग मार्चच्या तयारीबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.

  क्युरेटिव्ह पिटीशनचा पर्याय उपलब्ध

  मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका (रिव्ह्यू पीटिशन) दाखल करावी. जस्टिस गायकवाड आयोगाच्या शिफारसींचा बचाव करावा, न्यायालयाने रिव्ह्यू पीटिशन अमान्य केल्यास दुसरा पर्याय क्युरेटीव्ह पिटीशनचा पर्याय उपलब्ध आहे. केंद्र सरकारची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने एक व्यवस्था दिली आहे. त्याकरिता ३३ ब नुसार राज्याने प्रस्ताव तयार करून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी यावेळी केली.

  – काळ्या रंगाची वेषभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून आंदोलक दाखल

  – भरपावसात मराठा समाज आंदोलनस्थळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणला

  – मराठा समाजाने यापूर्वी ५८ मूक मोर्चावेळी आपल्या वर्तनाने जगात आदर्शाचे पालन आज करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेँद पाटील, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, राजेश पाटील, विनय कोरे आदी उपस्थित होते.