… म्हणून पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत; चंद्रकांत पाटलांनी केलं स्पष्ट

गोपीनाथ मुंडेंनी कार्यालयातील भाजप रस्त्यावर आणली. केवळ पत्रकं काढून भागणार नाही तर रस्त्यावर उतरलं पाहिजे या भावनेतून त्यांनी पक्ष वाढवला. अनेक संघर्ष केले. मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

  कोल्हापूर : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी कार्यालयातील भाजप रस्त्यावर आणली. केवळ पत्रकं काढून भागणार नाही तर रस्त्यावर उतरलं पाहिजे या भावनेतून त्यांनी पक्ष वाढवला. अनेक संघर्ष केले. मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

  पाटील नेमकं काय म्हणाले?

  दरम्यान एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतलं जावं हे त्यांना वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदं दिलं, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा लोकांनाही पदं दिलं. राजकारणताही सेम आहे. संघटनात्मक जबाबदारी असो की मंत्रिपदं देणं असो त्यांनी लोकांना शोधून शोधून पदं दिलं. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो, असं पाटील यांनी सांगितलं.

  पण लगेच सावरणं हे सुद्धा समजदारीचं लक्षण

  न्याय म्हणजे कोणावर तरी अन्याय होतोच. न्याय सर्वांनाच एकावेळी मिळू शकत नाही. भागवत कराडांना मंत्रिपद मिळालं तर प्रीतम यांना नाही मिळालं. राणेंना मिळालं तर रणजीत निंबाळकरांना नाही मिळालं. केंद्रीय मंत्रिमंडळात 28 जणांना जोडायचं होतं. त्यानंतर 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे 40 जणांना जोडायचं होतं. देश मोठा आहे. त्यात न्याय मिळतानाच कुणावर तरी अन्याय होतो. त्यात नेता नव्हे कार्यकर्त्याने रिअॅक्ट होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यात काही चुकीचं नाही. पण लगेच सावरणं हे सुद्धा समजदारीचं लक्षण आहे. ते काल पंकजा यांनी केलं. कुणी राजीनामे द्यायचे नाही. हे आपलं घर आहे. आपल्या घरातून का निघायचं बाहेर, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यावर इतके दुखाचे डोंगर कोसळलेले आहेत. तरीही या वयात त्यांनी मॅच्युरीचं टोक दाखवलं आणि सांभाळलं, असंही ते म्हणाले.

  पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

  नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंकजा समर्थकांनी पदाचे राजीनामे दिले होते. पंकजा यांनी काल या समर्थकांशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. मनातील खदखद बोलून दाखवतानाच महाराष्ट्र भाजपातील राजकारणावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मात्र, पक्षातच सक्रिय राहण्याचे संकेतही त्यांनी दिले. मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही. मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे, असं पंकजा म्हणाल्या होत्या.