सोमय्या यांच्या आरोपाचे कागल मतदारसंघात तीव्र पडसाद

    मुरगूड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचा निषेध व्यक्त केला. किरीट सोमय्या यांच्या मुंबई येथील पत्रकार परिषदेनंतर दुपारी दोन वाजता कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    माजीमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या विरोधात सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कागल, मुरगूड बिद्री-बोरवडे, खडकेवाडा, कापशी अशा विविध ठिकाणी खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.

    बिद्री-बोरवडे येथे निषेध सभेत धोंडीराम चौगुले यांनी किरीट सोमय्या यांचा निषेध केला. ते म्हणाले ,”अशाप्रकारे दोन अडीच वर्षांपूर्वी मुश्रीफ यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून काही हाती लागले नाही. आताही काही निघणार नाही. आजची ही कृती सूड भावनेतून केली असून सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.” या निषेध सभेस भर पावसात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गणपतराव फ़राकटे, रघुनाथ कुंभार, जि प सदस्य मनोज फराकटे उपस्थित होते.

    मुरगुड ता. कागल येथील निषेध सभेत येथे जाहीर निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी मुरगुड शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी, सत्यजितसिंह पाटील, सुधीर सावर्डेकर, नगरसेवक राहुल वंडकर, रवी परीट पदाधिकारी रणजित भारमल, पीटर बारदेस्कर, अमोल मंडलिक, निवृत्ती हासबे, बाजीराव मांगोरे, सुखदेव चौगले, अमर देवळे, पांडुरंग पुजारी, उमेश गुरव, सुनील डवरी, अक्षय भोसले उपस्थित होते.