पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्याने शिरोळमधील आंदोलन स्थगित

शिरोळ तालुक्यातील महापुरामुळे पुरग्रस्तांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.

    जयसिंगपूर : शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वेगवेगळ्या आंदोलनानंतर आज सोमवारी समितीने आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषण सुरू झाल्यानंतर दोन तासातच शिरोळ तहसीलदार कार्यालयात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आंदोलक, प्रशासनाची तातडीचे बैठक लावली. यावेळी ३० मागण्या मांडण्यात आल्या. सविस्तर चर्चेअंती २४ मागण्या मान्य करण्यात आल्या उर्वरित सहा विषयांसाठी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे यड्रावकर यांनी आंदोलकांना आश्वासन दिले. अखेरीस बहुतांशी मागण्या मान्य झाल्याने निवारण समितीच्या आंदोलनाला यश आले आहे.

    शिरोळ तालुक्यातील महापुरामुळे पुरग्रस्तांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. पूरग्रस्तांनी एकत्र येऊन ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यमातून आंदोलनाचा एल्गार पुकारला समितीमध्ये डॉ. संजय पाटील , सुशांत पाटील,शेतमजूर संघटनेचे सुरेश सासणे, सचिव दगडू माने, विजय पवार, बाळासाहेब माळी, सुनील इनामदार, विनोद पुजारी, विश्वास बालीघाटे, डी.आर पाटील, संजय पाटील खिद्रापूरकर यासह आंदोलकांनी पुरग्रस्तांच्या न्यायासाठी दोन ऑगस्ट पासून गाव चावंडीवर मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदार कार्यालयावर धनगरी ढोल घेऊन मोर्चा काढला. तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले तरीही याकडे दुर्लक्ष झाल्याने आज सोमवारी अखेर आमरण उपोषण सुरू केले.

    आमरण उपोषणाच्या इशाऱ्याने यड्रावकर यांनी तहसीलदार कार्यालयात बैठक घेत सकारात्मक भूमिका घेतली. यामध्ये पूरग्रस्तांना सोमवारी तातडीने 10 हजार सानुग्रह अनुदान बँक खात्यावर जमा केले जाईल. स्थलांतरित पुरग्रस्तांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार आहे. महापूराची कारणे शोधण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक च्या संयुक्त समितीची स्थापना केली जाईल.

    पूरग्रस्त नागरिकांसाठी पूर काळात निवाऱ्यासाठी तालुक्यात सहा सांस्कृतिक मोठे हॉल तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले आहेत. त्याचबरोबर कुरुंदवाड मध्ये तात्काळ ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यास प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यड्रावकर यांनी दिले. तद्नंतर आंदोलकांनी आभार मानले व आंदोलन स्थगित केले आहे असे घोषित केले. आंदोलनात महंमद कागवाडे, समीर पटेल, रघु नाईक, चांद कुरणे, सुरेश कांबळे शिरटीकर, अप्पासाहेब बंडगर, तुकाराम पवार आदी सहभागी होते.