जयसिंगपूर नगरपालिकेची इमारत वास्तुकलेचा उत्तम नमुना असेल : राजेंद्र पाटील-यड्रावकर

    जयसिंगपूर : शहराच्या विकासात भर घालणारी नगरपरिषदेची नवीन वास्तू ही अद्ययावत व सर्व सुविधायुक्त असणार आहे. जुनी इमारत जीर्ण व अपुरी असल्याने नवीन इमारत बांधकामासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. आणखी 7 कोटी निधी प्रस्तावित आहे. जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याकरिता सदैव प्रयत्न करीन. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम लवकरच सुरू करू अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.ते जयसिंगपूर येथील पालिकेच्या नवीन इमारतीचा पायाखुदाई शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ.निता माने होत्या. स्वागत व प्रास्ताविक करताना उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, पालिकेसाठी जूनी इमारत अपुरी व नादुरूस्त झाल्याने नविन प्रशस्त इमारत साकारण्यात येत आहे. त्याचबरोबर गेल्या 50 वर्षापासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी 200 कोटी रूपये निधीचा टप्पा लवकरच पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

    सूत्रसंचलन चिपरीचे माजी सरपंच बबन यादव यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी टिना गवळी, नगरसेवक शितल गतारे, राहुल बंडगर, महेश कलगुटगी, पराग पाटील, युनूस डांगे, बजरंग खामकर, अर्जुन देशमुख, दादा पाटील चिंचवाडकर, नगरसेविका रेखा देशमुख, अनुराधा आडके यांच्यासह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.