The first Hind Kesari Shripati Khanchanale passed away pailwanala 2 minitaant chit karun milavala kesari kitab

कुस्ती ही महाराष्ट्राची शान आणि मान आहे. महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली. देशातला पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी मल्ल श्रीपती खंचनाळे ( Hind Kesari Shripati Khanchanale) यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे असल्यामुळे त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

१९५९ ला हिंदकेसरी गदा मिळवून श्रीपती खंचनाळे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव उंचावले होते. तत्कालीन पंजाब केसरी पैलवान बनाता सिंग यांना पराभूत करत पैलवान श्रीपती खंचनाळे यांनी हा बहुमान पटकावला होता. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताबही मिळवला होता. १९५८,१९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धा सुद्धा पैलवान खंचनाळे यांनी जिंकल्या होत्या.

पैलवान श्रीपती खंचनाळे यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना अनेकांनी पुढे येऊन मदत केली यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीसुद्धा त्यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी उचलली होती. शिवाय ठाणे येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे १ लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली

कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, कुस्ती ही महाराष्ट्राची शान आणि मान आहे. महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली. देशातला पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले.

अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले. काळानुसार या खेळातील बदलांकडेही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले. त्यांना क्रिडाक्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील क्रिडा क्षेत्रातील आणि विशेषतः कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक असे छत्र हरपले आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.