राजाराम बंधाऱ्यावरून चारचाकी पंचगंगा नदीत कोसळली : चालक किनाऱ्यावर; वाहन गेले वाहून

कोल्हापूर : येथील कसबा बावडा ते वडणगे दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा येथे आज रविवारी एक चारचाकी थेट पंचगंगा नदीमध्ये कोसळली.सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

वडणगेहून कसबा बावड्याकडे ही चारचाकी येत होती राजाराम बंधारा येथून कसबाबावडयाकडे जाताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. आणि चारचाकी वाहन थेट पंचगंगा नदीमध्ये कोसळले.परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली. दरम्यान वाहनचालकाने प्रसंगावधान राखत चारचाकीवाहनातून नदीत उडी मारली आणि पोहत नदीकाठावर पोहचला. नागरिकांनी वाहनचालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र पाण्याच्या प्रवाहात चारचाकी वाहून गेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

या राजाराम बंधाऱ्यावर वाहनांनी दिवसभर वर्दळ असते. बंधाऱ्यावरुन दुचाकी, चारचाकी वाहनांची तसेच बैलगाड्यांची ये जा सुरू असते.यापूर्वी सुद्धा असे अपघात या बंधाऱ्यावर घडले आहेत.रविवारी दुपारी घडलेल्या घटनेवरुन पुन्हा एकदा बंधाऱ्यावरुन वाहतूक करताना सुरक्षिततेचा विषय मात्र ऐरणीवर आला आहे.