आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाला निधी देण्यासाठी सरकार सकारात्मकच; छत्रपती शाहू समधीस्थळासाठी ८ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

शाहू मिल इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचे हे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे,अशी शासनाचीही इछा आहे. पण हे काम मोठे असल्याने याबाबतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेटमध्ये चर्चा करुन निर्णय घेऊ.

कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्यासाठी राज्यशासनाकडून ८ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. शाहू मिलच्या जागेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाला निधी देण्यासाठी सरकार सकारात्मकच आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन कॅबिनेटमध्येच निर्णय घेऊ,असेही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.

महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत त्यांनी हे आश्‍वासन दिले. बैठकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव महेश पाठक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार चंद्रकांत जाधव, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर महापालिकेने आपले सादरीकरण केले. यामेध्य सर्वच विभागांचा आढावा घेण्यात आला. महापालिकेचे सुरु असलेले प्रकल्प आणि प्रस्तावीत प्रकल्पांची माहिती देण्यात आली. शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध करून देऊ. शाहू मिल इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचे हे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे,अशी शासनाचीही इछा आहे. पण हे काम मोठे असल्याने याबाबतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेटमध्ये चर्चा करुन निर्णय घेऊ.

सरकार याबाबतीत सकारात्मकच आहे. कोल्हापूर महापालिकेने पाच कोटी रुपये खर्च करुन सिध्दार्थनगर नर्सरी बाग येथे शाहू समाधीस्थळाचे काम केले आहे, अशी माहिती यावेळी उपायुक्त निखिल मोरे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. या समाधीस्थळाच्या ठिकाणी आर्ट गॅलरीसह अन्य कांही महत्वाची कामेही प्रस्तावीत असून या कामाचा दुसऱ्या टप्यातील निधीसाठी राज्यशासनाकडे आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती यावेळी सरनोबत यांनी दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी आठ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक म्हणाले, कोल्हापूर महापालिका हद्दीतील पायाभूत सुविधांसाठी पन्नास कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी केवळ 25 कोटी रुपयांचेच प्रस्ताव मिळाले असून उर्वरित २५ कोटीचे प्रस्तावही तातडीने पाठवा निधी देण्याची व्यवस्था केली जाईल. कोल्हापूरातच माझे प्रशिक्षण झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरशी माझे वेगळे नाते आहे. मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुद्दाम आम्ही इथं आलो काही गोष्टी मुंबईत शक्‍य होत नाहीत म्हणून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या अडचणी आहेत, त्या निदर्शनात आल्या पाहिजेत, म्हणून इथं येऊन बैठक घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेत असताना सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेत आहोत. एफएसआयच्या बाबतीत कोणताही गैरवापर करता येणार नाही. ज्याला स्वत:चे घर बांधायचे असेल त्याला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. फक्त महापालिकेची परवानगी घेऊन घर बंधू शकतात.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांसाठी हा निर्णय घेतला.