मर्सिडीजचा प्रवासही ट्रॅक्टरसारखा वाटतोय; टोल वसुलीवर राजू शेट्टी संतापले

पुणे ते सातारा हा रस्ता रिलायन्सने केला आहे व टोलही रिलायन्सच वसूल करते. इतके लाड कशासाठी रिलायन्स जिंदाबाद 'करलो दुनिया मुठ्ठी मे' अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

    कोल्हापूर : देशातील टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर आता पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोल वसुलीमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिल पासून टोलमध्ये 5% वाढ करण्यात आल्यामुळे वाहनधारकांना अधिकचा फटका बसणार आहे. तर, या टप्प्यातील महामार्गाची अवस्था ही दयनीय असून गेल्या दहा वर्षांपासून महामार्ग रुंदीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे, वाहनचालकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून अपघटनाचे प्रमाण देखील वाढत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील टोलधाडीवर संताप व्यक्त केला आहे.

    कागल ते बेळगाव जीपने प्रवास केल्यास मर्सिडीजने प्रवास केल्यासारखे वाटते. मात्र पुणे ते सातारा मर्सिडीजने प्रवास केल्यास ट्रॅक्टरने प्रवास केल्यासारखे वाटते असे राजू शेट्टी म्हणाले.

    पुणे ते सातारा हा रस्ता रिलायन्सने केला आहे व टोलही रिलायन्सच वसूल करते. इतके लाड कशासाठी रिलायन्स जिंदाबाद… ‘करलो दुनिया मुठ्ठी मे’ अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. कागल ते बेळगाव प्रवासात कोगनोळी टोलनाक्यावर कार व जीपसाठी टोल आकार 75 रूपये आहे. पुणे ते कागल महामार्गावर कामे अपूर्ण तरी खेड शिवापूर टोल नाक्यावर कार व जीपसाठी टोल आकार 95 वरून 100 रूपये करण्यात आला आहे.