आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘कोल्हापूरात परिस्थिती गंभीरच’

  कोल्हापूर : केंद्रीय पथकाचा कोरोना अहवालचा मुद्दा चुकीचा असल्याचे सांगत कोल्हापूरातील परिस्थिती गंभीरच आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. शहरातील एका कार्यक्रमास शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती सध्या तरी गंभीरचं आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू संख्येमध्ये सतत वाढ होत असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी केंद्रीय पथकाने जिल्हा रुग्णालय व अन्य ठिकाणी भेटी दिल्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर केंद्रीय आरोग्य पथक प्रमुख, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी पत्रकारांशी बोलताना कोल्हापुरातील परिस्थिती गंभीर नसल्याचे सांगितले होते.

  केंद्रीय पथकाच्या मताशी सहमत आहात का? असा प्रश्न येथे उपस्थित केला असता आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले, आपण याबाबत सहमत नसल्याचे सांगत केंद्रीय पथकाचा मुद्दा फेटाळून लावला.

  धोका अद्याप टळला नाही

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा २८ टक्‍क्‍यांनी अधिक होते. राज्याच्या अन्य भागात ते त्याहून अधिक पटीने होते. आता कोल्हापुरातील परिस्थिती काही प्रमाणात कमी होत आहे; मात्र धोका टळलेला नाही. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

  आवश्यक ती कार्यवाही केली जाणार

  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लाटेच्या शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यादृष्टीने राज्यातील अशी संभाव्य जिल्ह्यांसह कोल्हापुरात आवश्यक ती उपाययोजना, कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

  कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी आज मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तसेच, व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

  याबाबत टोपे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा चौथ्या टप्प्यात होता. तो तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर दुकाने सुरू होऊ शकतील. मात्र जिल्हा अद्याप तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही. तेथे पोहोचण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबत नूतन जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक होईल. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची भूमिका जाहीर केली जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले