चोरट्यांनी फोडली मंदिरातील दानपेटी; पैसे चोरण्याचा केला प्रयत्न पण…

आकुर्डे ता. भुदरगड येथील ग्रामदैवत श्री भुतोबा मंदिरातील दानपेटी काही चोरट्यांनी फोडून त्यातील पैसे चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

    गारगोटी : आकुर्डे ता. भुदरगड येथील ग्रामदैवत श्री भुतोबा मंदिरातील दानपेटी काही चोरट्यांनी फोडून त्यातील पैसे चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

    याबाबतची माहिती अशी की, आकुर्डे ता. भुदरगडपासून 3 किमी अंतरावर डोंगर विभागातील निसर्गरम्य परीसरात ग्रामदैवत श्री भुतोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिरात दररविवारी हजारो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिन्यात तर येथे गर्दीचा महापूर असतो. हे मंदिर अतिशय जागृत असल्यामुळे भुदरगड तालुक्यातील भाविकांची या मंदिरावर व देवावर प्रचंड श्रध्दा आहे. या श्रध्देपोटी या देवाच्या दर्शनासाठी आलेले भाविक येथील दानपेटीत भरघोस दान टाकतात.

    रविवारी पहाटे या मंदिरात आकुर्डे येथील पुजारी नियमित पुजा करण्यासाठी गेले असता, दानपेटी नियमित जागेपासून हलल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पेटी इतरत्र गेली कशी पाहत असताना त्यांना पेटी खाली काही रक्कम पडल्याचे दिसले. दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाच्या मदतीने त्यांनी ही पेटी उलटी करून पाहिली असता पेटीच्या खालील बाजूस असलेला कुलूपबंद छोटा दरवाजा उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पण हा दरवाजा निघाला किंवा तुटला नसल्याने यातील रक्कम सुरक्षित असावी असा अंदाज आहे.