कागल तालुक्यातील मुरगूड येथील तिघींना डेंग्यूची लागण

मुरगूड ता. कागल येथे मुख्य बाजारपेठेत भरवस्तीत मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या अमर गिरी यांची पत्नी व दोन मुलींना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

    मुरगूड : मुरगूड ता. कागल येथे मुख्य बाजारपेठेत भरवस्तीत मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या अमर गिरी यांची पत्नी व दोन मुलींना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
    मुख्य बाजार पेठेत नवमहाराष्ट्र चौकात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना डेंग्यू प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या पत्नी व महाविद्यालयीन व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलींना प्रादुर्भाव झाला आहे. पत्नी व मोठी मुलगी निपाणी येथे तर लहान मुलगी मुरगूड येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
    गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने संततधार कायम राखली आहे. मुरगूडमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर डेंग्यूने डोके वर काढल्यामुळे चिंता वाढली आहे. या घटनेची मुरगूड पालिका प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली आहे. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी आरोग्य विभागास त्याबाबत सूचना दिल्या आहेत.
    ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील म्हणाले, “गिरी यांच्या घराशेजारील सर्व परिसराचे सर्वेक्षण करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात, टेरेस, बाल्कनी, परसदारी, स्वच्छ पाण्याचा साठा करू नये. पावसाच्या स्वच्छ पाण्याने भरलेल्या रिकाम्या बाटल्या, डबे तसेच साठलेली डबकी, कचरा यांची निर्गत करावी. पाणी साठवण टाक्या स्वछ ठेवाव्यात, रोजच्या रोज पाणी वापरून आठवड्यातून किमान एकदा कोरडा दिवस पाळावा”.