कागलमधील दुर्गम शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणार : समरजितसिंह घाटगे

आयुष्यात माणसं कमावण्याचा संस्कार आई-वडिलांनी दिला. आता माणसं घडवण्यासाठी कागल मतदारसंघातील दुर्गम शाळा डिजिटल करून ई लर्निंग सुविधा देणार आहे.

  मुरगूड : आयुष्यात माणसं कमावण्याचा संस्कार आई-वडिलांनी दिला. आता माणसं घडवण्यासाठी कागल मतदारसंघातील दुर्गम शाळा डिजिटल करून ई-लर्निंग सुविधा देणार आहे. त्याची सुरुवात आजरा तालुक्यातील सोहोळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून करणार आहे, अशी घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे (Samarjeet Ghatge) यांनी केले.
  स्व राजे विक्रमसिंह घाटगे फौडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने २०२० व २०२१ वर्षातील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.१११ शिक्षकांना या सोहोळ्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊ महिला समिती कागलच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
  यावेळी बोलताना कोरोना काळात सेवा बजावताना मयत पावलेल्या कोरोना योद्धे शिक्षकांना राज्य शासनाने जाहीर केलेली ५० लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी आग्रही मागणी समरजितसिंह घाटगे यांनी केली.
  कॅन्सरमुक्त कागल अभियानाअंतर्गत महिलांसाठी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून कॅन्सरबाबत जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यावेळी शिक्षिकांनी यासाठी विशेष योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी महिला शिक्षिकांना केले.
  राजर्षी शाहुंच्या विचाराचे कागल घडवण्यासाठी साथ द्या
  आपल्या भाषणात समरजितसिंह घाटगे म्हणाले, “कागल मतदारसंघाची ओळख राज्यभरात कशी असेल हे ठरविण्याची वेळ आली आहे. राजर्षी शाहुंच्या विचाराचे कागल घडवण्यासाठी साथ द्या, असे आवाहन केले. शिक्षक पुरस्कार देताना शिक्षकाचा गट-तट बघून पुरस्कार देणारी माणसे आपण नाही. मतांची गोळाबेरीज करण्यासाठी पुरस्कार देत नसून शिक्षकांच्या चांगल्या कार्याची दखल घेण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत.
  यावेळी रणजितसिंह पाटील, अमरसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील, एम. पी. पाटील, अनंत फर्नांडिस, दत्तामामा खराडे, जीवन साळोखे, विलास पोवार, गट शिक्षण अधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, किरण लोहार, डी. एस. पाटील, राजेन्द्र तारळे, गडहिंग्लज भाजपचे अध्यक्ष, शाहू सहकार संस्थांचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.