चार दिवसानंतर पुणे-बंगळूर महामार्गावरून वाहतूक सुरू

    कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर पुराचे पाणी आल्याने चार दिवसांपासून बंद असलेली वाहतूक आज सोमवारी सुरू करण्यात आली. सध्या माल वाहतूक करणारी वाहने सोडण्यात येत आहेत. महामार्ग सुरू झाला असला तरी तावडे हॉटेल ते सांगली फाटा या दरम्यानच्या महामार्गावर अजूनही दीड फूट पाण्याची पातळी आहे.

    महामार्गावर पाणी आल्यामुळे चार दिवसांपासून संपूर्ण वाहतूक ठप्प होती. शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे पाणी आल्याने प्रथमतः पुण्याकडे जाणारा रस्ता बंद करुन एकाच रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. तर काही कालावधीतच पाण्याची पातळी वाढल्याने सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.

    महामार्गावर पाणी आल्यामुळे चार दिवसांपासून संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याने अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली होती. काल दिवसभरात जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याची चाचणी घेऊन सोमवारी पुराचे पाणी ओसरताच महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.