गावठी बॉम्बने रुग्णालय उडवण्याचा प्रयत्न; शहरात खळबळ

जयसिंगपूरमध्ये डॉ.सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल गावठी बॉम्बने उडवून लावण्याचा कट पोलिसांनी हानून पाडला आहे. एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला आहे.

    कोल्हापूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण चर्चेत असतांना आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये डॉ.सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल गावठी बॉम्बने उडवून लावण्याचा कट पोलिसांनी हानून पाडला आहे. एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला आहे.

    या घटनेमुळे जयसिंगपूर शहरात खळबळ माजली आहे. सांगली-कोल्हापूर मार्गावर डॉ.सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या कंपाऊड लगत गुरुवारपासून बेवारस अवस्थेत प्लॉस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडून होते. मात्र, सेक्युरिटी गार्डने सदरचे साहित्य पेशंटच्या नातेवाईकांचे असेल म्हणून दुर्लक्ष केले होते. आज सकाळी हॉस्पिटमधील भरत पाटील या कर्मचार्‍याच्या हे साहित्य असलेल्या पोत्यात टिक-टिक आवाज आला.

    यामुळे त्यांनी तपासले असता प्लॅस्टिकचा पाईप, वायर, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटसारखे साहित्य आढळून आले आहेत. पोत्यातून एक केबल बराच अंतरापर्यंत पडलेली लक्षात आलं. पाटील यांनी याबाबतची माहिती यांनी डॉ. सतिश पाटील यांना देऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे यांना कळवली. त्यानंतर काही वेळातचं बॉम्ब शोध व नाशक पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं.

    या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. पोलीसांनी अधिक तपास करण्यास सुरु केलं आहे. या प्रकरणात पोलीसांनी एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलीस ताब्यात घेणार असून, कोणत्या उद्देशाने हा गावठी बॉम्ब ठेवण्यात आला होता, याचाही तपास करण्याचे एक आव्हान आता कोल्हापूर पोलिसांसमोर असणार आहे.