वारणा दूध संघाची दुग्धालय क्षमता वाढणार : विनय कोरे

    कोल्हापूर : वारणा सहकारी दूध संघाने नव्याने हाती घेतलेल्या दुग्धालय विस्तारीकरण व नूतनीकरण यामुळे संघाचे दैनंदिन दूध हाताळणी क्षमता सुमारे साडे सात लाख लिटर होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी सांगितले. तात्यासाहेब कोरेनगर येथील श्री वारणा सहकारी दुध उत्पादक प्रक्रिया संघ व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत संघाच्या मुख्य दुग्धालयाचे नूतनीकरण व विस्तारीकरणाचे भूमीपूजन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
    वारणा दूध संघास राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मुख्य दुग्धालय नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात येणार असून त्यामुळे दूध हाताळणी क्षमता दोन लाख लिटरने वाढणार आहे. दुग्धालयात सकाळी संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव यांच्या हस्ते विधीवत पूजा पार पडली. अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे होते.
    वारणा दूध संघाने नवनवीन योजना राबवून प्रगतीचे यशस्वी टप्पे गाठले असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या मंजूर प्रकल्पास सुमारे २३ कोटी ६७ लाख इतका खर्च येणार आहे. पुढील काळात वारणा दुध संघात नवनवीन व अत्याधुनिक दुध प्रोसेसिंग प्रकल्प हाती घेणार असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.
    यावेळी सर्व संचालक, सांगलीचे दुग्धव्यवसाय अधिकारी नामदेव दवडते, बँक ऑफ इंडिया अमृतनगरचे मुख्य व्यवस्थापक अमित मिश्रा, संघाचे विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.