बैल मारण्यासाठी आल्यावर त्याची शिंगे पकडली ;ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

कोल्हापूर : वेगवेगळ्या रूपाने मारण्यासाठी आलेल्या बैलाची शिंगे पकडली, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.राज्यात काहीही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे बोलण्याआधी मुश्रीफ  वक्तव्य करतात. त्यांची ही कृती म्हणजे “आ बैल मुझे मार” व निष्ठा दाखवण्याची त्यांची केविलवाणी धडपड असते, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. राज्य सरकारच्या बदल्यांच्या प्रकरणावरून ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हजको’,  अशी टिप्पणी  मुश्रीफ  यांनी केली होती. त्यावर  पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून कोणतीही टीका करणारे विधान कधीच केले नव्हते. पहिल्यांदा अर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथी औषधामुळे लोकांच्या शरिरांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते. या आयुष्य मंत्रालयाच्या शासन निर्णयाप्रमाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला व खरेदी प्रक्रिया सुरू केली. अपेक्षित दर न आल्यामुळे त्यांचा निर्णय रद्द करून जिल्हा पातळीवर घ्यावा, असे आदेश काढल्यानंतर १५ दिवसांनी माहिती न घेता मुद्दाम माझी व माझ्या ग्रामविकास विभागाची बदनामी करण्याच्या उद्देशाने पाटील यांनी ग्रामविकास विभागाने २३ रुपये अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून भ्रष्टाचार केला व त्याच गोळ्या दोन  रुपयांनी मी खरेदी करून कोथरूड मतदारसंघांमध्ये दिल्या आहेत,असे विधान केले होते.तसेच १५ व्या वित्त आयोगाचा निधी ८०% ग्रामपंचायत, १०% जि.प. व १०% पंचायत समिती यांना देण्याचा निर्णय मी घेतला होता. त्याप्रमाणे निधीचे वाटप झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी यांनी माझा सत्कार केला होता. त्यास उद्देशून पाटील यांनी हा तर केंद्र शासनाचा निर्णय असून मुश्रीफ हार कसे घालून घेत आहेत? असे कुत्सित विधान केले होते. मी वरील दोन्ही गोष्टीवरून त्यांना माफी मागण्याची विनंती केली होती व  माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी बदनामीचा दावा दाखल करण्याचे सांगितले होते. सर्वांचे पुरावे त्यांच्याकडे पाठवले होते. अद्याप त्यावर त्यांचे उत्तर नाही की, माफीही मागितली नाही. तसेच दोन  रुपयाला अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून द्याव्यात, असे आवाहन केले होते. यावरही त्यांचे उत्तर नाही.

एक दिवस अचानक त्यांनी मला व सतेज पाटील यांना पत्र पाठवून त्यांचेवर न केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन कोरोना काळामध्ये आपण किती मदत केली ,  त्यांची उदाहरणे देऊन आम्हांस आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले होते. त्यावर मी उत्तर देतानाचंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे कसे आहेत, याचे सोदाहरण स्पष्टीकरण दिले होते. एक चेहरा परोपकारी,  प्रांजळ, लोकांना प्रामाणिक आहे असा भास व्हावा व दुसरा चेहरा सत्ता संपत्तीच्या जोरावर आपल्या विरोधकास जीवनातून उठवण्याचा. यासाठी माझ्यासाठी महाराष्ट्र राज्य बँकेवर केलेली कारवाई, जिल्हा बँक कलम ८८ अन्वये दबाव आणून अधिकार्‍याकडून निकाल देतेस भाग पाडणे,  फक्त माझ्यासाठीच १०  वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने आणलेला अध्यादेश, इन्कमटॅक्स व ईडी कारवाई …… वरील सर्व गोष्टीसाठी स्वतःच्या  आरएसएसच्या दोन वकीलांची मॉनिटरिंग करण्यासाठी नियुक्ती व वरील खटल्यासाठी देशातील व राज्यातील सिनियर वकिलांची उभी केलेली फौज फक्त हसन मुश्रीफ यांना आयुष्यातून उठवण्यासाठीच. तेच मला सत्तेचा उपयोग करून रक्तबंबाळ करून ‘आ बैल मुझे मार’, असे विधान करत चोराच्याच उलट्या बोंबा याचाच प्रत्यय देत आहेत.

मला निष्ठा दाखवण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागते,  खरोखर अशी हास्यास्पद विधाने तरी करू नका.  कारण कितीही संकटे आली,  मला भाजपमध्ये घेऊन मंत्री केले की, प्रचंड माया दिली त्यावेळीही पवार एके पवार म्हणणारा, मी राष्ट्रवादी  कॉंग्रेस पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे. सत्ता असली काय आणि नसली काय. मला फरक पडत नाही. ज्यावेळी परमेश्वराच्या कृपेने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सत्ता येते,  त्यावेळी फक्त लोककल्याण व विकास हे दोनच माझ्या डोळ्यासमोर असतात.सत्तेचा वापर करून शत्रूचेही भले करण्याचा माझा प्रयत्न असतो. लोक वैचारिक विरोधक असतात, ते आपले शत्रू असत नाहीत. पाटील यांनी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये कंपन्यांचे संचालक असल्याचे लपवल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला करावा. अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत. त्याबद्दल मला कोणतेही देणे घेणे नाही. असे व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा त्यांच्या वाळल्या पालापाचोळ्यावरसुद्धा मी पाय ठेवत नाही. ही माझी संस्कृती आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.