कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या बाळंतिणीला व्हाईट आर्मीमुळे जीवदान

कोल्हापूर: बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ओल्या बाळंतिणीला व्हाईट आर्मी(white army) आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटरमुळे जीवदान मिळाले.सोळा सप्टेंबर रोजी ही बाळंतीण आपल्या १३ दिवसांच्या नवजात कन्येसह आपल्या आईच्या घरी जाणार आहे..कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्या या आपल्या मुलीला जीवदान मिळाल्याने घरची मंडळी हरखून गेली आहेत.सासरच्या आणि माहेरच्या मंडळींनी व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे आणि त्यांच्या सर्व मेहनती जवानांचे तसेच मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर आणि विशेष करून तिच्यावर उपचार करणारे डॉ.आबाजी शिर्के यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

प्रयाग चिखली येथील मुलगी लग्नानंतर मुंबईला आली.संसार सुखाचा सुरू झाला.गरोदरपणात बाळंतपणासाठी तिला माहेरी यायचे होते. ती तीन महिन्यांपूर्वी प्रयाग चिखलीमध्ये माहेरी आली.एका नामांकित प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरकडे तिच्यावर गरोदरपणात उपचार सुरू होते. दिवस भरले आणि तीन सप्टेंबर रोजी तिच्या पोटात दुखू लागले म्हणून दवाखान्यात नेले.पण स्वॅब घेतल्याशिवाय तिला दाखल करून घेण्यासाठी डॉक्टर तयार झाले नाहीत.अशातच तिचा स्वॅब दिला आणि तो पॉझिटिव्ह आला. हे ऐकून ‘त्या’डॉक्टरने या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला नकार दिला. घरच्या लोकांची तारांबळ उडाली.मात्र जवळच्याच एका डॉक्टरांनी तिला आपल्या पेशाला शोभेल असे निर्णय घेऊन तिला आपल्या दवाखान्यात दाखल करून घेतले. प्रसव वेदना असह्य झाल्या,पण डॉक्टरांनी सिझेरियन करून बाळाचा आणि मातेचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास या मातेने एका गोंडस कन्या रत्नाला जन्म दिला.या मातेचे नाव अमृता गुरव.

प्रसव पीडा सहन केल्यानंतर आणि बाळाच्या जन्मानंतर मातेचे पुनर्जन्म होते असे म्हणतात.मात्र ही माता कोरोनाग्रस्त झाली. मग माहेरच्या लोकांची काळजी वाढली. अमृताला कोरोनाच्या उपचारासाठी आता कोणत्या दवाखान्यात ठेवायचे या चिंतेने ग्रासले.पण अमृताचा मामा बाळकृष्ण गुरव हे एका दवाखान्यात नोकरीला असल्याने त्यांना वैद्यकीय क्षेत्राची जाण होती. त्यांनी तात्काळ अशोक रोकडे यांना संपर्क साधला. आपल्या भाचीला आलेली अडचण आणि घरच्यांसमोर उभा ठाकलेला प्रसंग कथन केला. व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता या मातेला तात्काळ व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करायला सांगितले. मध्यरात्री २ वाजता आपल्या नवजात कन्येसह अमृता गुरव कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाली.बाळाची काळजी घ्यायला तिची जुनी जाणकार आजीसुद्धा याच कोविड सेंटरमध्ये राहिली.अमृताला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबाजी शिर्के आणि त्यांचे सहायक डॉ.अमोल कोडोलीकर या दोघांच्या देखरेखीखाली तब्बल बारा दिवस उपचार करण्यात आले. या काळात व्हाईट आर्मीच्या नर्स हिना यादवाड यांनी अमृताला काय हवंय काय नको याची काळजी घेतली.तिची मनापासून सुश्रूषा केली.सोबतीला व्हाईट आर्मीचे कोरोना योद्धे जवान होतेच..
आता १३ दिवसांनी अमृताच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि त्या पूर्णपणे निगेटिव्ह आल्या आहेत.त्यामुळे अमृता आपल्या नवजात कन्येसह माहेरी चालली आहे.

या बाळ आणि बाळंतिणीला असंच जाऊ दिले जाणार नाही बरं का !! उद्या सकाळी व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटर मधून जितक्या महिला कोरोनामुक्त होवून गेल्या आहेत त्या सर्व पुन्हा या कोविड सेंटरमध्ये परत येणार आहेत.त्या कशासाठी माहिती आहे का ? अहो व्हाईट आर्मीच्या वतीने या नवजात कन्येच्या नामकरण समारंभाचे आयोजन करण्यात आलंय आणि अशोक रोकडे आजोबा आणि या कन्येचे सगळे व्हाईट आर्मीचे जवान मामा आणि नर्सिंगस्टाफ मधील आत्या सुद्धा या नामकरण समारंभात सहभागी होणार आहेत.