
Pune News: पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट; थंडीचा कडाका वाढला
तापमानातील या घटीमुळे शहरात गारवा वाढला असून पहाटे सोबतच रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. रस्त्यांवर नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर अशा उबदार कपड्यांमध्ये वावरताना दिसत आहेत. दिवसाच्या वेळी सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव कायम राहते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी घसरण होण्याचा इशारा दिला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस किमान तापमान सुमारे १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात आणखी घट होऊ शकते. कमाल तापमानातही किंचित कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे पुण्यातील थंडी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ञांनी व्यक्त केली आहे.
तापमान घटल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी तज्ञांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. उबदार कपडे वापरणे, सकाळच्या थंड हवेत अनावश्यक बाहेर पडणे टाळणे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून पुणेकरांनी सज्ज राहण्याची गरज आहे.
दिनांक कमाल तापमान किमान तापमान
१२ नोव्हेंबर ३० १३.७
१३ नोव्हेंबर ३० १३.७
१४ नोव्हेंबर ३० १२.७
१५ नोव्हेंबर ३० १२
१६ नोव्हेंबर २९ १२