आरोग्यमंत्री ठरले जालन्याचा वाढप्या; रेमडीसिवीरच्या तुटवड्यामुळे लातुरकरांना आठवले विलासराव

    लातूर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यांच्या अनेक भाषणातून ‘वाढप्या ओळखीचा असला पाहिजे’, असे म्हणत होते. त्यांच्या या विधानाची मनातून आठवण सध्या लातूरकरांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे येत आहे.

    दरम्यान जालना जिल्ह्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दहा हजार इंजेक्शनच्या वाटपाला सुरुवात केली आणि लातूर जिल्ह्यात रेमडेसिव्हिरसाठी त्याच्या वापरावरच बोट ठेवले जात आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यासाठीही दहा हजार इंजेक्शन्सची नोंदणी केली असून लवकरच ते उपलब्ध होण्याची आशा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पीयांनी व्यक्त केली आहे.

    विलासरावांच्या वाक्याची आठवण

    विलासराव देशमुख म्हणायचे की, पंगतीत भोजन वाढणारा अर्थात वाढप्या ओळखीचा असल्यास तो कमी पडणार नाही, याची काळजी घेतो. याप्रमाणे सरकार दरबारी ओळखीची व्यक्ती असेल तर सरकारच्या विविध योजनांचा लाभ न मागताही होतो.याच पद्धतीने अनेक भाषणांतून विलासराव देशमुख हे वाढप्या ओळखीचा असला पाहिजे, याची जाणीव करून दिल्याने जिल्ह्याला न मागताही अनेक गोष्टी मिळतात, त्यांच्या या वाक्याची लातूरकरांना काही दिवसापासून सातत्याने आठवण येत आहे.

    जालन्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे ओळखीचा वाढप्या 

    लातूर जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना तो कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याने लातूकरांना साहेबांच्या ‘त्या वाक्याची आठवण येत आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी रात्रंदिवस भटकंती करीत आहेत. विविध ठिकाणी वशिले लाऊन इंजेक्शन उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच गुरुवारी जालना येथे आरोग्यमंत्री टोपे यांनी दहा हजार रेमडेसिव्हिरच्या वाटपाला सुरुवात केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जालन्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे ओळखीचा वाढप्या ठरले. लातूरकरांना मात्र, ओळखीचा वाढप्या नसल्याची खंत आहे.

    दरम्यान, गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठकीतूनच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी मोबाईलवरून रेमडेसिव्हिर तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.