लातुरातील घटना; एकाच मृतदेहावर केले दोनवेळा अंत्यसंस्कार…

लातूरमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. एकाच पार्थिवावर दोन वेळा अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं.

    लातूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे आणि परिणामी अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर लातूरमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. एकाच पार्थिवावर दोन वेळा अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं.

    चाकूर तालुक्यातील शेळगावचे रहिवासी धोंडीराम सदाशिव तोंडारे यांना उदगीर येथे कोरोना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तब्येत खराब झाल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर धोंडीराम यांचा लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

    धोंडीराम सदाशिव तोंडारे यांचा मृत्यू झाला यावेळी अंबाजोगाईच्या हातोला येथील आबासाहेब सखाराम चव्हाण यांचाही मृत्यू झाला होता. तसेच मृतदेह कोरोनाबाधित असल्याने नियमानुसार प्रशासनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करते. यावेळेला मात्र तोंडारे यांचा मृतदेह समजून आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह अंबाजोगाईच्या हातोला येथे नेण्यात आला आणि त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कारही झाले.

    हा सर्व प्रकार, नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नाही असं म्हणून त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. या सर्व प्रकारानंतर शेळगाव येथे धोंडीराम तोंडारे यांचा मृतदेह नेण्यात आला होता, त्यांचा मृतदेह आणण्यासाठी चव्हाण यांचे नातेवाईक शेळगावला पोहोचले आणि अंत्यविधी करण्यात आलेला चव्हाण यांचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी नेऊन पुन्हा एकदा अंत्यसंस्कार केले. या सर्व प्रकरणात नातेवाईकांनी चुकून मृतदेह नेला असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणामुळे प्रशासनाची मोठ्या प्रमाणात धावपळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.