शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील श्रमाला MREGS मधून वेतन द्या; आमदार अभिमन्यू पवार यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्य शासनाने जो शेतकरी स्वतः शेतात कष्ट करतो त्याच शेतकऱ्यांना MREGS अंतर्गत जॉबकार्ड करून त्यांना मजुरी द्यावे. अशी मागणी औसा मतदार संघातील भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

    लातूर : राज्यातील शेतकरी दरवर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रात भरडून जात आहे. अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. बेभरवशाचा पाऊस, वाढता उत्पादन खर्च व हमी नसलेल्या शेतमाल यामुळे आर्थिक दुष्ट चक्र शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात केलेल्या कष्टाला MREGS मधून रोजगार द्यावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

    दरम्यान राज्यातील शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेने त्रासलेले आहेत वाढता उत्पादन खर्च, हमी नसलेला बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेती उत्त्पन्न घटत आहे. यातच संसाराचा ताळमेळ भागवण्यासाठी अनेकदा कर्ज काढावी लागत असल्याने शेतकरी आत्महत्या हा दरवर्षीचा चिंतेचा विषय आहे.

    तसेचं गत काळात केंद्र व राज्य सरकारने कर्जमाफी केली परंतु ती सुद्धा तोकडी पडली आहे. भविष्यात शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात मशागतीपासून लागवड व पीक काढणी पर्यंत केलेल्या कष्टाला राज्याच्या MREGS योजनेतून मजुरी दिल्यास नक्कीच शेतकऱ्यांना दरमहा चार पैसे उपलब्ध होतील, यातून घरखर्च  व अन्य खर्चाला शासकीय हातभार लागल्यामुळे अर्थचक्राला गती येऊन राज्यातील शेतकरी समृद्ध होईल.

    त्यामुळे राज्य शासनाने जो शेतकरी स्वतः शेतात कष्ट करतो त्याच शेतकऱ्यांना MREGS अंतर्गत जॉबकार्ड करून त्यांना मजुरी द्यावे. अशी मागणी औसा मतदार संघातील भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.