धीरज देशमुख निवडून यावेत म्हणून राजकीय ‘फिक्सिंग’; ठाकरे, फडणवीस यांच्यावर थेट निशाणा

धीरज देशमुख निवडून यावेत म्हणून विधानसभा निवडणुकीत राजकीय ‘फिक्सिंग’ झाल्याचा गौप्यस्फोट लातूरचे भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे. हे आरोप करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

लातूर : धीरज देशमुख निवडून यावेत म्हणून विधानसभा निवडणुकीत राजकीय ‘फिक्सिंग’ झाल्याचा गौप्यस्फोट लातूरचे भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे. हे आरोप करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

फडणवीस, ठाकरे, देशमुख यांनी एकत्रित येऊन राजकीय फिक्सिंग केल्याचं उघडपणे सांगण्याचा प्रयत्न निलंगेकर यांनी केला आहे. काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख निवडून यावेत म्हणून शिवसेनेनं फिक्सिंग केल्याचा थेट आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय. लातूर ग्रामीण आधी भाजपने सोडला, नंतर तिथे शिवसेनेने दुबळा उमेदवार दिला. परिणामी अमित देशमुखांचे बंधू धीरज निवडून आले.

लातूर ग्रामीणची जागा परंपरागतपणे भाजप लढवतं. पण गेल्या विधानसभेला ती जागा भाजपानं सोडली आणि औशाची जागा स्वत:साठी घेतली. औशातून देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार उभे राहिले आणि निवडूनही आले. त्यांनी काँग्रेसचे त्यावेळेचे आमदार बस्वराज पाटील यांचा पराभव केला. औशाची जागा परंपरागतपणे शिवसेना लढवते. दिनकर माने हे तिथं शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.

लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुखांचे पुत्र आणि मंत्री अमित देशमुखांचे बंधू धीरज देशमुख यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेने सचिन देशमुख हा फारसे परिचित नसलेला उमेदवार दिला. परिणामी लातुरात धीरज देशमुख विरुद्ध नोटा अशी लढत झाली. देशातली कदाचित ही एकमेव लढत असावी जिथं मुख्य उमेदवार विरुद्ध नोटा अशी लढत झाली असावी.

यावरुन निलंगेकर यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. न लढता फिक्सिंग करणं हा लोकशाहीचा खून केला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.