लातुरच्या विलास साखर कारखान्याची तब्बल 8 कोटीची फसवणूक; आरोपीला केली पोलिसांनी अटक

लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याची 8364 मेट्रिक टन साखर निर्यातीची फसवणूक केल्या प्रकरणी अहमदनगर येथील एका व्यक्तीला नांदेडमधून मुरुड पोलिसांनी अटक केली आहे.

    लातूर : लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याची 8364 मेट्रिक टन साखर निर्यातीची फसवणूक केल्या प्रकरणी अहमदनगर येथील एका व्यक्तीला नांदेडमधून मुरुड पोलिसांनी अटक केली आहे.

    फसवणूक कशी केली?

    केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक साखर कारखान्यास त्यांनी उत्पादित केलेल्या साखरे मधून काही साखर निर्यात करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे भारत सरकारकडून मिळालेल्या कोट्यातील कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेपैकी 8364 मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील कुरिंजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याचे अहमदनगर येथील रहिवासी असलेले प्रतिनिधी अभिजीत देशमुख यांच्यामार्फत 8364 मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी कंपनीसोबत करार करण्यात आला होता. त्याप्रमाणे सदर कंपनीने 8364 मेट्रिक टन साखर कारखान्यामधून साखर निर्यात करण्यासाठी घेऊन गेले. साखर घेऊन गेल्यापासून 90 दिवसाचे आत सदरची साखर निर्यात केल्या बाबतचे कागदोपत्री पुरावे सादर करणे आवश्यक असताना सदरचे कागदपत्र साखर कारखान्यास दिलेले नाही. कारखाना प्रशासनाने वेळोवेळी सदर कंपनीकडे कागदपत्रांची मागणी केली तेव्हा सदरचे कागदपत्रे देण्यास कंपनीने टाळाटाळ केले. त्यामुळे साखर कारखान्याचे 8 कोटी 73 लाख 87 हजार 72 रुपयाचे नुकसान झाले.

    आरोपीला 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

    सदर कंपनीचे कार्यकारी संचालक चंद्राबाबू प्रदीपराज चेअरमन मदिगा मनिकांत उर्फ मनीकृष्णा तसेच कंपनीचे संचालक प्रदीप राज गायत्री व कंपनीचे प्रतिनिधी अभिजीत देशमुख, व सदर कंपनीचे इतर जबाबदार पदाधिकारी यांनी संगनमत करून कारखान्याकडून निर्यातीची साखर कमी दरात खरेदी करून साखर निर्यात करतो असे भासवून स्थानिक बाजारात त्या साखरेची चढ्या भावाने विक्री करून विश्वासघात केला व कारखान्याचा 8 कोटी 73 लाख 87 हजार 72 रुपयाचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केली. याबाबत निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याचे विधी सहाय्यक अशोक तोडकर यांच्या तक्रारी वरून पोलीस ठाणे मुरुड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक आरोपीला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.