धक्कादायक : सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं तरुणाला बेदम मारहाण

सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी माचीस मागितल्यानंतर, माझ्याकडे माचीस नाही, असं म्हटल्यानं आरोपींनी फिर्यादी तरुणाला मारहाण केली आहे. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. दरम्यान याप्रकरणी पीडित तरुणानं पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना लातूर शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

    लातूर : सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी माचीस मागितल्यानंतर, माझ्याकडे माचीस नाही, असं म्हटल्यानं आरोपींनी फिर्यादी तरुणाला मारहाण केली आहे. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.

    दरम्यान याप्रकरणी पीडित तरुणानं पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना लातूर शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. यशोधन केशवराव कातळे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. पीडित तरुण यशोधन हा शिक्षणानिमित्त लातूर शहरात राहतो.

    नेमकं काय घडलं?

    घटनेच्या दिवशी यशोधन आपला मित्रासोबत गप्पा मारत उभा होता. दरम्यान त्याठिकाणी मनोज धोत्रे नावाचा व्यक्ती आला. त्यानं फिर्यादीच्या मित्राला सिगरेट पेटवण्यासाठी माचीस मागितली. माचीस नाही असं सांगितल्यानं आरोपी व्यक्तीनं विनाकारण फिर्यादीशी आणि त्याच्या मित्र याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्याचबरोबर आरोपी धोत्रेनं दोघांना शिवीगाळही करायला सुरुवात केली. शिवीगाळ करू नका, असं सांगितल्यावर आरोपी मनोज धोत्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादीला आणि त्याच्या मित्राला लोखंडी कत्तीनं आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

    याप्रकरणी लातूर शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी मनोज धोत्रेसह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केली नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.