निलंगा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, वेतन थकल्याने उचललं पाऊल…

नगरपरिषदमधील कारभारामुळे तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे हे कामगार त्रस्त होते. याच आर्थिक विवंचनेतून बाबुराव नामदेव गायकवाड या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

  लातूर : कोविड काळात सफाई कामगारांनी उत्तम काम केले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कामावर हजर होते. मात्र, नगरपरिषदमधील कारभारामुळे तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे हे कामगार त्रस्त होते. याच आर्थिक विवंचनेतून बाबुराव नामदेव गायकवाड या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

  दरम्यान त्यांचा आठ महिन्यापासुन पगार थकित होता. सकाळी ही घटना कळल्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद निलंगा येथे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  निलंगा नगरपरिषद येथे 36 सफाई कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत तर 70 कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपात कार्यरत आहेत. या 70 कामगारांचे नियंत्रण खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. नगरपरिषद निलंगा यांनी सदरील एजन्सीला सर्व बिले अदा केली असताना देखील एजन्सीने कामगारांचे वेतन वेळेवर दिले नाही. यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

  जोपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह झाडावरुन खाली काढू देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

  तसेचं यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी हजर होते. वाढता असंतोष लक्षात घेऊन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी येत कर्मचाऱ्यांचे मत ऐकून घेतले. त्यानंतर मृतदेह झाडावरुन खाली काढण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी निलंगा येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

  गुन्हा दाखल करावा

  बाबुराव नामदेव गायकवाड हे मागील 35 वर्षांपासून नगरपरिषद निलंगा येथे मस्टर वरील सफाई कामगार या पदावर काम करत आहे. काही वर्षांनंतर त्यांना कंत्राटी स्वरुपात कार्यरत करण्यात आले. आज ना उद्या आपन कायमस्वरूपी कर्मचारी होऊ या आशेवर ते काम करत होते. मात्र, एजन्सीला काम देण्यात आले, त्यांनी पगार रोखला. तोही आठ महिन्यापासून याची तक्रार नगरपरिषद प्रशासनास करावी तर ते एजन्सीकडे बोट करतायात. एजन्सी दाद लागू देतच नाही. घरातील दोन मुले, बायको यांचा संसार कसा चालवाव याची चिंता त्यांना होती. त्यांच्या सारखीच अनेक कर्मचाऱ्यांची अवस्थता आहे. यातून त्यानी आज सकाळी आत्महत्या केली. दत्ता गायकवाड यानी निलंगा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. मुख्याधिकारी, कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.