सुनांनी वयोवृद्ध सासूला दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये पोटगी द्यावी

आईवडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम अर्थात सिनिअर सिटीझन कायद्यानुसार सांभाळ न करणाऱ्या मुलांकडून पोटगी मागण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे.

लातूर (Latur).  आईवडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम अर्थात सिनिअर सिटीझन कायद्यानुसार सांभाळ न करणाऱ्या मुलांकडून पोटगी मागण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. ज्येष्ठांकडून मुलांसोबत सुनांकडूनही पोटगी मागण्यात येत आहे. अशाच एका प्रकरणात तीन विधवा सुनांनी वयोवृद्ध सासूला दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये पोटगी द्यावी तर अन्य दोन प्रकरणांत मुलांसोबत सुनांनीही सासूला पोटगी द्यावी, असे आदेश उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांनी दिले आहेत.

पहिल्या प्रकरणात बोरी (ता. लातूर) येथील सासू मन्याबाई व ऊर्फ मनकरणबाई गोविंद भालके यांनी पती व तीन मुलांच्या निधनानंतर सुना लक्ष्मीबाई भालके, आरुणा भालके व सुनीता भालके या पालनपोषण व सांभाळ करत नसल्याची तक्रार करून तीनही सुनांकडून पोटगी मिळण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीत तीनही सुनांनी सासूचा सांभाळ करण्याची तयारी दाखवत मन्याबाई त्यांच्या खोपेगाव येथील मुलींकडे वास्तव्याला असल्याचे सांगितले तर जावई शिवदास ग्यानोबा मोरे हे सासूबाईला आमच्याकडे पाठवत नसल्याचा युक्तीवाद सुनांनी केला.

सुनांनी पोटगी देण्याची तयारी दाखवत पोटगीची रक्कम घेऊन मुलीने किंवा सुनांपैकी दरमहा एकीने सासूंचा सांभाळ करण्याबाबत लेखी म्हणणे दाखल केले. त्यानंतर यादव यांनी मन्याबाई यांच्या उदरनिर्वाह व औषधोपचारासाठी तीनही सुनांनी दरमहा प्रत्येकी हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. दुसऱ्या प्रकरणात शिवाजीनगरमधील फुलाबाई तानाजी माने यांनी मुलगा शाहूराज माने, सुना राधा शाहुराज माने व सिंधुबाई युवराज माने यांच्याकडून पोटगी मिळण्याची मागणी केली होती.

तिघेही घरातून बेदखल करण्याचा प्रयत्न करून त्रास देत असल्याची तक्रार फुलाबाईंनी केली. पोलिस ठाण्यातही त्यांनी अशी तक्रार दिली होती. सुनावणीत मुलगा व सुनांनी फुलाबाई यांचा चांगला सांभाळ करण्याचे तसेच त्यांना कसलाच त्रास देण्याचे बंधपत्र दाखल केले. सुनावणीअंती उपविभागीय अधिकारी यादव यांनी फुलाबाई यांना मुलगा शाहूराज व सून सिंधुबाई यांनी दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये पोटगी द्यावे, असे आदेश दिले.

मुलगा व सुनेने पोटगी द्यावी (The son and daughter-in-law should be fed)
तिसऱ्या प्रकरणात जुना औसारोड भागातील कमलबाई गंगाधर वाडकर यांनी मुलगा सिद्धेश्वर व सून राजलक्ष्मी वाडकर हे सांभाळ न करता घरातून बेदखल करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्याकडून पोटगी मिळण्याबाबत अर्ज केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीत कमलबाई यांनी सून राजलक्ष्मी हिच्याविरोधात पोलिसांतही तक्रार दिल्याचे दिसून आले. सुनावणीअंती मुलगा व सुनेने मिळून कमलबाई यांना दरमहा चार हजार रूपये पोटगी द्यावी, असे आदेश उपविभागीय अधिकारी यादव यांनी दिले आहेत. पोटगीची रक्कम दरमहा वयोवृद्ध महिलांच्या बँक खात्यात जमा करून त्याचा पुरावा दाखल करण्याचे आदेशही यादव यांनी मुलगा व सुनांना दिले आहेत.