धक्कादायक घटना! धारदार शस्त्राचा वापर करत तरूणाची दिवसाढवळ्या हत्या अन् आरोपी फरार

लातुरमधील सद्गुरू नगर येथे आल्यानंतर त्या दोन्ही तरूणांनी दिवसाढवळ्या गोकुळ मंत्री यांच्या डोक्यात आणि शरिरावर चाकूसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत त्यांच्यावर सपासप वार केले. त्यानंतर हे दोन्ही तरूण घटनास्थळावरून फरार झाले

    लातूर : धारदार शस्त्राचा वापर करत तरूणाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास घडली. कत्ती आणि चाकू यांसारख्या शस्त्राचा वापर करत एका ३५ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे लातुरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचे गोकुळ मंत्री असे असून वयवर्ष ३५ आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मृत गाेकुळ मंत्री हे आपल्या माेटारसायकलवरुन आज तीन वाजताच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यांच्यासोबत दुचाकीवर दोन तरूण प्रवास करत होते.

    परंतु लातुरमधील सद्गुरू नगर येथे आल्यानंतर त्या दोन्ही तरूणांनी दिवसाढवळ्या गोकुळ मंत्री यांच्या डोक्यात आणि शरिरावर चाकूसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत त्यांच्यावर सपासप वार केले. त्यानंतर हे दोन्ही तरूण घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गोकुळ यांचा मृत्यू झाला.

    दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, त्यांनी पंचनामा केला असून याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर दाेघे मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. परंतु त्यांच्या अटकेसाठी पाेलीस पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र, हत्या करण्याचं यामागील नेमंक काय कारण आहे. हे अद्यापही अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच पुढील चौकशी आणि तपास सुरू आहे.