‘लातुरातील दोन साखर कारखाने ईडीच्या रडारवर’; निलंगेकरांचा गौप्यस्फोट

राज्यातील साखर कारखानदारीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. आता त्यांची चौकशी केली जात आहे. लातूर जिल्ह्यातही कारखानदारीत असंख्य घोटाळे असून आता 'ते' कारखानेही चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. यातून बरेच काही उघडकीस येणार असून शेतकर्‍यांच्या पैशावर ज्यांनी दरोडा टाकला ते उघडे पडतील, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

    लातूर : राज्यातील साखर कारखानदारीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. आता त्यांची चौकशी केली जात आहे. लातूर जिल्ह्यातही कारखानदारीत असंख्य घोटाळे असून आता ‘ते’ कारखानेही चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. यातून बरेच काही उघडकीस येणार असून शेतकर्‍यांच्या पैशावर ज्यांनी दरोडा टाकला ते उघडे पडतील, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. सहकाराचा स्वाहाकार करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लातूर जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या पैशावर उभे असलेले सहकारी साखर कारखाने अत्यंत कवडीमोल किमतीने खरेदी केलेले आहेत.

    हे कारखाने आता ईडीच्या रडारवर आले आहेत. या कारखान्यांना लवकरच चाप लागणार आहे, असे आ.संभाजी पाटील म्हणाले. शेतकर्‍यांच्या नावावर, शेतकर्‍यांचे शेअर्स घेऊन सहकारी कारखाने उभे करण्यात आले. ते दिवाळखोरीत काढले आणि वैयक्तीक जहागिरी असल्याप्रमाणे कवडीमोल किंमतीत विकत घेतले. ते विकले, ही अत्यंत गंभीर बाब आहे. सहकाराच्या नावावर स्वाहाकार करुन शेतकर्‍यांना लुटण्याचे, लुबाडण्याचे पाप त्यांनी केले आहे. ते आता उघडे पडणार आहे.

    तसेचं लातूर जिल्ह्यात अहमदपूर व उदगीर तालुक्यातील साखर कारखाने चुकीच्या पद्धतीने खरेदी केले आहेत. ते आता उघडे पडतील. खर्‍या अर्थाने पुतना मावशीचे प्रेम असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उघडे पडतील, असा विश्‍वास माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला असून लातूर जिल्ह्यातील हे दोन्ही कारखाने ईडीच्या रडारवर आहेत. सहकारातून कूटूंबाची समृद्धी, कूटूंबाचा विकास झाला आहे. स्वत:ला सहकार सहर्षी, सहकार सम्राट असे ही मंडळी म्हणवून घेतात. नेते कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटत आहेत ते सुद्धा या माध्यमातून उघडे पडेल, असेही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.