अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवू : संभाजी पाटील निलंगेकर

सरकारला जाब विचारण्याची आणि शेतकर्‍यांचा  आक्रोश सरकारपर्यंत पोहचत नसल्याने आज लातूरात 72 शेतकर्‍यांना सोबत घेऊन भाजपाच्या वतीने 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

    लातूर : अतिवृष्टी आणि नदीपात्रातून सोडलेले पाणी यामुळे अस्मानी व सुल्तानी या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचा आक्रोश अद्यापही सरकारपर्यंत पोहचलेला नाही. शेतकर्‍यांना मदत मिळावी याकरीता सरकारला जाब विचारण्याची आणि शेतकर्‍यांचा  आक्रोश सरकारपर्यंत पोहचत नसल्याने आज लातूरात 72 शेतकर्‍यांना सोबत घेऊन भाजपाच्या वतीने 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

    लातूर येथील अन्नत्याग आंदोलनात माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा संघटन सरचिटणीस तथा जि.प. सदस्य संजय दोरवे, मनपा गटनेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    संभाजी पाटील नेमकं काय म्हणाले?

    अतिवृष्टी आणि पुरस्थितीने शेतकर्‍यांचे कधीच न भरून निघणारे नुकसान झाले आहे असे सांगत आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी सरकारच्या निष्क्रीय व दुर्लक्षीत धोरणामुळे शेतकर्‍यांची अवस्था ना जगता येत नाही ना मरता येत नाही अशी झालेली आहे. मात्र यापरिस्थितीत संपुर्ण जगाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍यांना सरकारने वार्‍यावर सोडले आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्याकरीता कुंभकर्णी झोपेत असणार्‍या सरकारला जागे करून शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण भाग पाडणार असून त्याकरीता बांधील असल्याची ग्वाही आ. निलंगेकरांनी दिली. त्यामुळेच ज्या पद्धतीने शेतकर्‍यांना 72 तासाचा अवधी देण्यात आलेला होता त्यानुसारच आम्ही सरकारला 72 तासाचा अल्टीमेंटम दिला आहे. अजूनतरी सरकारने मदतीची कोणतीच घोषणा किंवा त्या दृष्टीने हालचाल सुरु केलेली नाही. या कारणाने लातूर येथील शिवाजी चौकात 72 शेतकर्‍यांना सोबत घेऊन 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.