
भारतात काही वर्षांपूर्वी एक असा राजा होऊन गेला, जो दिवसाला ३५ किलोपेक्षा जास्त अन्न खात असे. या राजाचं नाव महमूद बेगाडा. पहिला मोहम्मद शहा या नावाने देखील या राजाची ओळख होती. गुजरातचा हा पहिला राजा.
मोहम्मद शहानं गुजरातमध्ये तब्बल ५३ वर्ष राज्य केलं. १४५८ ते १५११ या कालावधीत पहिला मोहम्मद शहा हा सुलतान होता. मोहम्मद बेगडा अत्यंत बळकट आणि शक्तिशाली राजा म्हणून ओळखला जात होता. तो अत्यंत खादाड होता आणि कित्येक किलो अन्न तो बघता बघता फस्त करत असे.
विषदेखील प्यायचा राजा
एकदा या राजाला युरोपियन आक्रमकांकडून विषबाधा करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर भविष्यात आपल्याला विषबाधेचा कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी त्यांने विष पचवण्याची कला अवगत करायला सुरुवात केली. त्यासाठी तो रोज एक ते दोन कुपी भरून विष प्यायचा आणि ते पचवण्याचा सराव करायचा. त्यामुळे विष हा त्याच्या रोजच्या आहारातला एक भाग होता.
शाही नाष्टा
या राजाचा नाश्ता म्हणजे केवळ १ कप लोणी, १ कप मध आणि फक्त १५० केळी. एवढा नाश्ता हा राजा रोज करायचा. या राजाला रोज ३५ ते ३७ किलो अन्न लागायचं. या राजाला इतकी भूक लागायची की तो बसल्या बैठकीला २० ते २५ किलो अन्न फस्त करून टाकत असे. यामध्ये भात, मसाले आणि इतर गोड पदार्थांचाही समावेश असायचा.
डेझर्टचं काय?
एकंदर राजाची भूक पाहून सगळेजण अवाक् व्हायचे. जेवणानंतरच मिष्टान्नही तर तो किलोमध्ये खात असे. या राजाला साधारण २० ते २२ किलो जेवण केल्यानंतर साधारणतः साडेचार किलो पेक्षा जास्त शिरा, खीर किंवा इतर गोड पदार्थ लागत.
तरीही रात्री लागे भूक
दिवसभर एवढं अन्न खाल्ल्यानंतरदेखील या राजाला रात्रीच्या वेळी भुकेची जाणीव होत असे आणि त्यासाठी राजाला भूक लागल्यानंतर काहीतरी हाताशी असावं म्हणून त्याच्या उशाला जवळपास ५ डझन केळी ठेवण्यात येत. जेव्हा-जेव्हा त्याला रात्री झोपेतून भूक लागून जाग येई, तेव्हा जवळ ठेवलेल्या केळी किंवा इतर फळांवर तो भूक भागवत असे.
जगभर ख्याती
या राजाची कीर्ती जगभर पसरली होती. रोज ३५ ते ४० किलो अन्न खाणारा राजा, ही ख्याती ऐकून दूरवरून लोक गुजरातला या राजाला भेटण्यासाठी येत. आपण ऐकलेली आख्यायिका खरी आहे का याची प्रत्यक्ष पाहून खातरजमा करत आणि आश्चर्यचकित होऊ परत जात.