दुपारी जेवणानंतर ‘या’ चुका करत असाल तर वजन वाढलंच म्हणून समजा

सकाळी व्यायाम केल्यानंतर काही प्रमाणात थोडं गोड खाल्लं तर ठीक आहे. एखाद्या दिवशी गोड खाणं चालू शकते. पण दररोज गोड खाण्याची सवय त्रासदायक ठरू शकते. म्हणून दुपारच्या जेवणानंतर गोड खाणं टाळा.

    मुंबई : वजन वाढीची समस्या आजकाल अनेकांना भेडसावते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध पद्धतींचा वापर करतात. काहीजण वजन कमी करण्यासाठी डाएट करतात तर काही योगावर भर देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दुपारच्या जेवणानंतरच्या काही सवयी तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. पु. ल. देशपांडे यांनीही लिहून ठेवलंय की, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

    जर तुम्ही दुपारच्या जेवणात सलाड खात असाल मात्र त्यानंतर चहा-कॉफी घेण्याची सवय असल्यास वजन वाढतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर काही गोष्टी टाळण्याचा सल्ला नेहमी तज्ज्ञ देतात. जाणून घेऊया या सवयींबद्दल.

    दुपारी गोड पदार्थांचं सेवन

    सकाळी व्यायाम केल्यानंतर काही प्रमाणात थोडं गोड खाल्लं तर ठीक आहे. एखाद्या दिवशी गोड खाणं चालू शकते. पण दररोज गोड खाण्याची सवय त्रासदायक ठरू शकते. म्हणून दुपारच्या जेवणानंतर गोड खाणं टाळा.

    गोड पदार्थांचं प्रमाण मर्यादित ठेवा

    कूकीज तसंच चॉकलेट सारखे गोड पदार्थ बघून प्रत्येकाची खाण्याची इच्छा होते. मात्र खूप भूक लागल्याशिवाय असे पदार्थ खाऊ नका. एखादा खास प्रसंग किंवा सेलिब्रेशन असल्यास गोड खाण्यास हरकत नाही. परंतु हे पदार्थ खाताना त्याचं प्रमाण मर्यादित असावं.

    दुपारी झोपणं

    तुम्ही सकाळी व्यायाम करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर बसून राहालं. तुमच्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. दुपारी जेवल्यानंतर झोपणं किंवा डेस्कवर बसून राहणं योग्य ठरणार नाही. यासाठी काही वेळाने थोडं चाललं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये टायमर लावू शकता.

    उशिरा जेवणं

    अवेळी जेवल्याने शरीरावर काही परिणाम होत नाही, फक्त हेल्दी खाणं गरजेचं असल्याचं अनेकांना वाटतं. the International Journal of Obesityच्या अहवालानुसार, जे लोक दुपारी ३ नंतर जेवण घेतात त्यांचं वजन कमी होण्याची शक्यता कमी असते. कारण त्यामुळे मेटॅबॉलिझमच्या प्रक्रियेत अडथळे येतात.

    दुपारी कॉफी पिणं

    दुपारी ३ नंतर कॉफी पिणं योग्य ठरणार नाही. कॉफीमुळे अन्नपचनास मदत होत असली तरी जेवल्यानंतर लगेचच ॲसिडिक पदार्थांचं सेवन त्रासदायक ठरतं. त्याचप्रमाणे कॉफीमधल्या साखरेमुळे कॅलरीज वाढतात. मात्र जर तुम्हाला कॉफी घेण्याची सवय असल्यास जेवणानंतर ४५ मिनिटांनी घ्या.

    after lunch you will gain weight if you make these mistakes