भाज्या खाऊन कंटाळा आलाय? तर नक्की ट्राय करा फणसाची भजी, जाणून घ्या रेसिपी

  उन्हाळ्याच्या दिवसांत येणारे फणस एक प्रकारची भाजीच आहे. याची भाजी चवीला इतकी स्वादिष्ट लागते की, तुम्ही चिकन खाणं बंद कराल. तशी तर फणसाची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेलच पण याची भजी ट्राय केलीत का? जर नसेल खाल्ली, तर जाणून घ्या याची रेसिपी…

  साहित्य –

  • कच्चा फणस- ५०० ग्रॅम
  • मीठ- चवीनुसार
  • हिंग- चिमूटभर
  • बेसन- १ कप
  • तांदळाचे पीठ- १/२ कप
  • हिरवी मिरची- २ बारीक चिरून
  • लाल मिर्ची पावडर-१/२ चमचा
  • धने पावडर- १/२ चमचा
  • आमचूर पाउडर- १/२ चमचा
  • गरम मसाला- १/२ चमचा
  • ओवा – १/२ चमचा
  • तेल- तळण्यासाठी

  रेसिपी

  फणसाची भजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम साल काढून त्याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. कुकरमध्ये फणस, अर्धा कप पाणी, अर्धा चमचा मीठ व चिमूटभर हिंग टाकून एकजीव करून घ्या. कुकर बंद करा आणि १ शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्या. गॅस बंद करा आणि त्यानंतर तो थंड होऊ द्या. पाणी काढून घ्या आणि मोठ्या भांड्यात एक कप बेसन, तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिश्रण तयार करा.

  आता या मिश्रणात हिरव्या मिरच्या, ओवा, लाल मिरची पावडर, धने पावडर, आमचूर आणि गरम मसाला टाकून योग्य प्रकारे मिश्रण एकजीव करा. या मिश्रणात एक चमचा तेल टाकून पुन्हा ते मिश्रण एकजीव करा. सर्वात शेवटी उकळून घेतलेला फणस मिक्स करून मिश्रण एकजीव करा. कढईत तेल गरम करा. थोड्या-थोड्या प्रमाणात बेसन पीठाच्या मिश्रणात हे फणसाचे तुकडे गरम तेलात सोडा आणि सोनेरी होईपर्यंत सर्वबाजूंनी व्यवस्थित तळून घ्या.

  फणसाची भजी तळताना एक ध्यानात घ्या की, हे तळायला सहा ते सात मिनिटांचा वेळ लागेल. भजी टिशू पेपरवर काढून घ्या कारण जास्त झालेले तेल निघून जाईल. ही भजी हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस सोबत सर्व्ह करा.