भावांनो रक्षाबंधनाच्या निमित्याने बहिणीला द्या ‘ही’ पाच वचने

भाऊ बहिणीचे नाते तसे अनोखेच. राखी पौर्णिमा प्रेम आणि कर्तव्य यांची सूचक आहे. विशेष म्हणजे एक साधासा धागा बंधुरायाच्या हातात बांधून बहिण जन्मभराचे रक्षण करण्यासाठी भाऊरायाला जणू बंधनात बांधते आणि यासाठी भाऊ बहिणीचे रक्ताचे नाते हवे असेही नाही. कोणत्याही जातीधर्माची या बंधनासाठी अट नसते. असतो तो केवळ बंधुभाव.

बदलत्या काळानुसार भेटवस्तू देण्यात बदल झालेली असली तरी बहिण-भावाच्या प्रेमात कोणतेही बदल झाले नाही. त्यामुळे या बदलत्या काळानुसार प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला अशी भेटवस्तू द्यावी, ज्यामुळे तिच्या विचारात आणि तिच्या जीवनशैलीतही सकारात्मक बदल घडतील.

१. निर्णय घेण्यास सक्षम बनवा
केव्हाही घरात एखादा निर्णय घेतला जातो किंवा एखादे मत मांडले जाते तेव्हा मुलींना निर्णय घेण्यास सक्षम समजले जात नाही. परंतु आपली बहिणसुद्धा एखाद्या विषयात योग्य निर्णय घेऊ शकते हे संपूर्ण कुंटुंबाला भावाने पटवून द्यावे.

२. एकटीस बाहेर जाण्यास शिकवा
बहिणीला जर एखाद्या कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर ती आपल्या भावाकडे आशेने पाहत असते की तिचा भाऊ तिला सोडेल. आणि जर बाहेर जाताना सोबत कोणी नसेल तर ते घाबरतात. त्यामुळे प्रत्येक भावाने आपल्या बहिणीमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.

३. बहिणीला बनवा धीट
बहिणीला भावापेक्षा कमकुवत मानले जाते. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न जाणे, कोणी काही म्हटल्यास त्यास प्रत्युत्तर न देणे, बाहेर जाताना अपरिचित व्यक्तींसोबत न बोलणे अशा काही गोष्टी मुलींना सांगण्यात येतात. परंतु यावेळी तुम्ही आपल्या बहिणीला शारीरिक व मानसिकरित्या बळकट होण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे तुमची बहिण कोणत्याही कठिण प्रसंगास एकटे सामोरे जाईल. यासाठी तुम्ही तिला स्वरक्षणाचे धडे देणाऱ्या प्रात्यक्षिक वर्गाला जाण्यासाठी प्रेरित करा.

४. बहिणीला द्या भावनिक आधार
घरात अनेकवेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्या बहिणीला भावनिक आधाराची गरज असते. आपल्या बहिणीसोबत कोणत्याही प्रसंगात आपण तिच्यासोबत आहोत, असा विश्वास तिला द्या.

५. घरात मोकळीकता द्या
मुलीने प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगण्याव्यतिरिक्त आपले वडील आणि भावालाही सांगू शकेल एवढी मोकळीकता द्या.