
काही धर्मांमध्ये निषिद्ध मानण्यात आलेल्या डुक्कराच्या मासाचा वापर या लसीच्या उत्पादनात करण्यात आल्यावरुन काही धर्मगुरुंनी या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या आक्षेपांमुळे जगभरातील लसीकरण मोहीम संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : कोविड १९ ला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीमध्ये डुकराच्या मासाचा वापर करण्यात आल्याची चर्चा आहे, यामुळे ही लस योग्य आहे की नाही, याबाबत जगभरातील इस्लामिक धर्मगुरुंमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एका बाजूला कोरोनाचे संकट रोखण्यासाठी जगभरातील मोठमोठ्या कंपन्या कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आणि त्या जगातील सर्व देशांमध्ये कशा पोहचतील यासाठी कार्यरत आहेत, तर दुसरीकडे काही धर्मांमध्ये निषिद्ध मानण्यात आलेल्या डुक्कराच्या मासाचा वापर या लसीच्या उत्पादनात करण्यात आल्यावरुन काही धर्मगुरुंनी या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या आक्षेपांमुळे जगभरातील लसीकरण मोहीम संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या लसींच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीच्या काळात सुरक्षा आणि प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी डुक्कराच्या मासापासून (पोर्क) तयार करण्यात आलेल्या जिलेटिनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. डुकराच्या मासाचा वापर न करता, लस तयार करण्याचा प्रयत्नही काही वर्षांपासून काही कंपन्या करीत आहेत. स्वित्झर्लंडमधील औषध कंपनी नोवारटिसने डुकराच्या मासाशिवाय मैनिजाइटिस लस तयार केली होती, याबरोबरच साऊदी आणि मलेशियात असलेल्या एजे फआर्मा कंपनीनेही असा प्रयत्न केला होता.
या आक्षेपांनंतर आता औषध कंपन्यांही स्पष्टीकरण देत आहेत. फायझर, मॉर्डन आणि एस्ट्राजेनेका कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी, लसीच्या उत्पादनात डुक्कराचे मास वापरले नसल्याचा दावा केला आहे. मात्र अनेक औषध कंपन्या अशाही आहेत, की त्यांनी लसीत डुक्कराच्या मासाचा वापर केला आहे की नाही, याचे स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही. अशा स्थितीमुळे मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियासारख्या देशांचीं चिंता वाढीस लागली आहे.
ब्रिटिश इस्लामिक मेडिकल एसोसिएशनचे सरचिटणीस सलमान वकार यांचे म्हणणे आहे की ‘जुन्या विचारांचे यहुदी आणि मुस्लिमांमध्ये लसीकरण करण्याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. निषिद्ध मानण्यात आलेल्या डुक्कराचे मास असलेली लस कशी घ्यायची, असा संभ्रम या सगळ्यांपुढे आहे’. सिडनी विश्वविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हरनूर राशीद यांच्या म्हणण्यानुसार, लसीत वापरण्यात आलेल्या पोर्क जिलेटिनच्या वापराबाबत आत्तापर्यंतच्या झालेल्या चर्चांमध्ये सहमती दर्शवण्यात येते आहे.
या लसींचा उपयोग केला नाही, तर मोठे नुकसान होण्याची श्कयता असल्याने, इस्लामी कायद्यानुसार ही लस स्वीकार्य असल्याचा दावाही करण्यात येतो आहे. इस्रायलमधील रब्बानी संघटना ‘जोहर’ चे अध्यक्ष रब्बी डेविड स्टेव यांनी म्हटले आहे की, ‘ डुकरांच्या मासाला पर्यायच राहिला नाही, तर याला आक्षेप असण्याचे कारण नाही, असे यहुदी कायदे सांगतात. जर ही लस अन्नातून नव्हे तर इंजेक्शनद्वारे शरीरात देण्यात येत असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. महामारीसारख्या स्थितीत पोर्कचा उपयोग निषिद्ध मानण्याची गरज नाही’