Coronavirus effect on family planning operations Shocking truth revealed by medical authorities

कोरोनामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांना फटका बसला आहे. कुटुंब नियोजना अंतर्गत करण्यात येणारी नसबंदी शस्त्रक्रिया ही त्यापैकीच एक आहे. महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१९-२० मध्ये १७,६५९ महिला आणि ११६ पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. तर, याच वर्षी मार्च ते नोव्हेंबरपर्यंत २००७ महिला आणि फक्त १२ पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे.

  • नोव्हेंबरपर्यंत अवघ्या ११ टक्के महिला आणि ९ टक्के पुरुषांनी करून घेतलीये नसबंदी शस्त्रक्रिया

सूरज पांडे, नवभारत

कुटुंब लहान सुख महान असा डंका दशकांपासून देशात गाजतो आहे. सरकार कुटुंब नियोजनाकरिता नसबंदी शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित करत आहे, पण यावेळी सरकारचा हा बार फुसका ठरलाय. कोरोनाने या नसबंदीवर अक्षरक्ष: पाणी फेरलंय. मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरपर्यंत अवघ्या ११ टक्के महिला आणि ९ टक्के पुरुषांनीच नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईने सहन केलाय. शहरात २ लाख ८५ हजार ६३२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात १०,९७० जण आयुष्याला मुकले आहेत. कोरोनामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांना फटका बसला आहे. कुटुंब नियोजना अंतर्गत करण्यात येणारी नसबंदी शस्त्रक्रिया ही त्यापैकीच एक आहे. महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१९-२० मध्ये १७,६५९ महिला आणि ११६ पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. तर, याच वर्षी मार्च ते नोव्हेंबरपर्यंत २००७ महिला आणि फक्त १२ पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. तथापि वर्षाच्या अखेरीस या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी, जनावरांच्या बाबतीत हेच प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहे.

महापालिकाकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने लोकं घरातच होते म्हणून नसबंदीचे प्रमाण कमी झाले आहे. आजमितीला सर्व शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. रुग्णांमध्ये संक्रमण वाढू नये यासाठी रुग्णालयांत आवश्यक ती काळजीही घेण्यात येत आहे. आता नसबंदी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी मनात कोणताही किंतु, परंतु न ठेवता थेट रुग्णालयात यायला हवं त्यांना येथे यासंबंधी सर्व मार्गदर्शन करण्यात येईल.

कोरोनामुळे संपूर्ण वर्षभर लोकांना भीतीने ग्रासलंय. आरोग्य विभाग कोरोनाशी दोन हात करण्यात गुंतला होता. एवढं असूनही आम्ही नसबंदीचं काम सुरूच ठेवलं होतं पण कोरोना संक्रमणाच्या भीतीने लोकं पुढे येईनाशी झाली आहेत. आम्ही एक आढावा बैठक घेणार आहोत. आमच्या कुटुंब नियोजन केंद्रात लोकांमध्ये याविषयी गनजागृती करण्याचं कामही सुरू आहे. आम्हाला आशा आहे की, मार्चपर्यंत या आकडेवारीत निश्चितच भर पडेल.

डॉ. मंगला गोमरे, मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका, मुंबई

नसबंदी शस्त्रक्रियेचा पुरुषांनी घेतलाय धसका

नसबंदी केल्यानंतर आपला पुरुषार्थ संपुष्टात येईल अशी पुरुषांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे, पण, हे पूर्णत: चुकीचं आहे. पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया अवघ्या अर्ध्या तासात होते आणि यात जोखीमही कमी असते.तथापि महिलांची ओपन सर्जरी असते आणि यात त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.

डॉ. अशोक आनंद, प्रसुति व स्त्रीरोग विभागप्रमुख, जे जे रुग्णालय, मुंबई

नसबंदी शस्त्रक्रियेची आकडेवारी

वर्ष महिला पुरुष
२०१५ – २०१६ १८९१० ८१०
२०१६ –  २०१७ २०७४५ ७२९
२०१७ – २०१८ २०७५० ९१४
२०१८ – २०१९ १९२६३ १८५
२०१९ – २०२० १७६५९ ११६
२०२० – २०२१ (नोव्हेंबर) २००७ ११