४० वर्षांनंतर डॉक्टरांवर महिलेने केला वैद्यकीय बलात्काराचा आरोप; प्रेग्नन्सीसाठी केलंय इतक्या हीन पातळीचं घाणेरडं आणि भयंकर दुष्कृत्य

व्हॉस यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संमतीशिवाय डॉक्टरांनी त्यांच्यामध्ये स्वत:च्या शुक्राणूंचा (Sperm) वापर करून गर्भधारणा (Pregnancy) घडवून आणली. ही बाब आपल्याला ४० वर्षांनंतर माहीत झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तक्रारीत असं लिहिलं आहे की, काही लोक या भयानक कृत्याला 'मेडिकल बलात्कार' (Medical Rape) म्हणतात.

  नवी दिल्ली : वैद्यकीय बलात्काराचे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेनं ४० वर्षानंतर आपल्या डॉक्टरांवर वैद्यकीय बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, तिला गर्भवती होण्यात अडचणी होत्या. तेव्हा तिने शुक्राणू दात्याच्या (Sperm Donor) शोधात डॉक्टर मार्टिन ग्रीनबर्ग यांची भेट घेतली.

  बियान्का व्हॉस नावाच्या या महिलेने डॉक्टर ग्रीनबर्ग यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाला दिलेल्या कागदपत्रात व्हॉस यांनी लिहिले आहे की, त्यांनी डॉ. ग्रीनबर्ग यांची १९८३ मध्ये फर्टिलिटी सर्व्हिससाठी भेट घेतली होती. व्हॉस यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संमतीशिवाय डॉक्टरांनी त्यांच्यामध्ये स्वत:च्या शुक्राणूंचा वापर करून गर्भधारणा घडवून आणली. ही बाब आपल्याला ४० वर्षांनंतर माहीत झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  तक्रारीत असं लिहिलं आहे की, काही लोक या भयानक कृत्याला ‘मेडिकल बलात्कार’ म्हणतात. ग्रीनबर्ग यांची ही कृती अत्यंत चुकीची, जाणीवपूर्वक केलेली, अनैतिक, अस्वीकार्य आणि बेकायदेशीर आहे. ४० वर्षांनंतर आपल्याला याचं सत्य माहीत झालं आहे. व्हॉस म्हणाल्या की, जेव्हा त्यांची मुलगी रॉबर्टाला डीएनए प्रोफाइल मिळाला, तेव्हा तिला ग्रीनबर्ग यांच्या कृत्याविषयी माहिती मिळाली. यात रॉबर्टाच्या वडिलांचं नाव म्हणून डॉक्टर ग्रीनबर्ग यांचं नाव नोंदविण्यात आलं होतं. हा सर्व प्रकार न्यूयॉर्कमधील आहे.

  न्यायालयाला दिलेल्या निवेदनात व्हॉस यांनी पुढं सांगितलं आहे की, त्यांनी डॉ. ग्रीनबर्ग यांना एक अज्ञात दाता उपलब्ध करण्यास सांगितलं होतं. ग्रीनबर्ग यांनी यासाठी व्हॉस यांना तेव्हा १०० डॉलर्सचे (७,३२५ रुपए) शुल्क आकारले होते. तसंच विचारलं होतं की, दात्याच्या जाती-धर्माविषयी त्यांची काही विशेष प्राथमिकता आहे का?

  व्हॉस यांनी अमेरिकेच्या एनबीसी न्यूजला सांगितलं, ‘मला एक अज्ञात दाता हवा होता. ग्रीनबर्गनं मला विचारलं की, दाता यहुदी असेल तर मला काही हरकत नाही ना? मी म्हणाले, मला अडचण नाही. मला वाटलं की, कदाचित शुक्राणू देणारा त्यांच्या रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थी असेल. पण सत्य वेगळंच होतं. यानंतर त्यानं दात्याला देण्यासाठी माझ्याकडून १०० डॉलर्सचा धनादेशही घेतला.’

  दस्ताऐवजानुसार, या प्रक्रियेत ग्रीनबर्गनं स्वत:चेच शुक्राणू वापरले. त्यानंतर व्हॉसनं १९८४ मध्ये एका मुलीला जन्म दिला. व्हॉस म्हणाल्या, ‘त्यांनी स्वतःचे शुक्राणू वापरणार असल्याचं मला सांगितलं नाही. दाता एक अज्ञात व्यक्ती असेल, असं त्यांनी म्हटलं होतं. डॉक्टर स्वत:च्या शुक्राणूंचं दान करू शकत नाहीत, अशी ग्वाहीही त्यानं दिली होती.’ सध्या ग्रीनबर्ग यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

  वास्तविक, रॉबर्टा तिच्या कौटुंबिक इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तेव्हा तिला तिच्या जैविक वडिलांविषयी (Biologival Father) ही माहिती मिळाली. तक्रारीत तिनं असं म्हटलं आहे की, रॉबर्टानं तिच्या वैद्यकीय इतिहासाची चौकशी करण्यासाठी ग्रीनबर्ग यांच्याशी बर्‍याच वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानं काही प्रतिक्रिया दिली नाही.

  न्यायालयाकडे केलेल्या याचिकेत व्हॉस यांनी म्हटलं आहे की, ग्रीनबर्गमुळं आपल्याला मोठा धक्का बसला आहे. भावनिक वेदना आणि त्यांचा विश्वास तुटण्याच्या या घटनेने त्या व्यथित झाल्या आहेत.’ त्यांच्या तक्रारीत त्यांनी डॉ. ग्रीनबर्गकडून ७५,००० डॉलर्स (५४,९७,८०० रुपयांपेक्षा जास्त) नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

  अशा प्रकारे डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना स्वतःचे शुक्राणू वापरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. १९८० मध्ये एका घटनेत डॉक्टरांनी रुग्णामध्ये स्वतःचे शुक्राणू रोपण केल्याची बाब समोर आली होती. २०१९ मध्येही कॅनडातील एका डॉक्टरनं परस्परच स्वतःचे शुक्राणू ५० ते १०० रुग्णांना दिल्याचं उघडकीस आलं होतं. ही बाब सिद्ध झाल्यानंतर संबंधित डॉक्टरचा परवाना रद्द झाला होता.