घरगुती उपायांनी करा सुरकुत्यांना बायबाय!

चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे वाढत्या वयाची लक्षणे आहे. खास करून डोळ्याखालील सुरकुत्या हे वाढत्या वयाकडे इशारा करते.  ज्या दिसायला खूप वाईट दिसतात. असं असलं तरी, तुम्ही ठरवलंत तर वेळेआधीच ही समस्या तुम्ही रोखू शकता आणि तारुण्य अबाधित राखू शकता. यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

केळं आणि मध :-  पिकलेलं केळं चांगलं कुस्करून घेऊन त्यामध्ये काही थेंब मध टाकून डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि मग अध्र्या तासाने चेहरा पाण्याने धुवून घ्या.

अंडे :- अंडय़ामुळे डोळ्यांखाली पडणा-या सुरकुत्या कमी होतात असं मानलं जातं. पण जेव्हा केव्हा तुम्ही अंडं लावाल तेव्हा त्यातला पिवळा बलक काढून पांढरा भाग लावा. यामुळे त्वचा घट्ट होते.

टोमॅटो आणि गुलाबपाणी :- टोमॅटोच्या रसात काही थेंब गुलाबपाणी मिसळून लावल्याने डोळ्यांखालची काळी वर्तुळं नाहीशी होऊ शकतात. हवं असल्यास गुलाबपाण्यात भिजवलेला कापूस बंद डोळ्यांवर ठेवा. तो ५ ते १० मिनिटं तसाच राहू द्या. या उपायाने तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा तजेलदार होईल.

मसाज करा :- ब-याचदा त्वचेला नीट रक्ताभिसरण प्राप्त होत नाही आणि त्यामुळेही डोळ्यांखाली सुरकुत्या येतात. अशात, तुम्ही एरंडेल तेलाने डोळ्यांच्या खाली मसाज करा. यामुळे सुरकुत्यांची समस्या दूर होईल. याव्यतिरिक्त तुम्ही खोबरेल तेलानेही मसाज करू शकता. हे तेल रात्रभर तसंच राहू द्या आणि मग दुस-या दिवशी सकाळी धुऊन टाका.