‘व्हायरल’ ठेवा दूर; करा हे उपाय

 

पावसाळ्यात सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप हे आजार नेहमीचेच आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे हे त्रास होतात. त्यापासून दूर राहायचे असो किंवा आजारातून लवकरात लवकर बरे व्हायचे असेल तर हे घरगुती उपाय करून पाहा…

खडीसाखर : खडीसाखरेत अनेक औषधी गुणधर्म आहेत. खोकला किंवा ढास असेल तर खडीसाखर चघळावी, लवकर आराम मिळतो. सारखी उचकी लागत असेल तरी उचकी थांबवण्याचा हा रामबाण उपाय आहे.

मध : कफ, सर्दी, खोकला यावर आयुर्वेदात सांगितलेला हा चांगला उपाय आहे. कोमट पाण्याबरोबर मध घेतल्यास फायदा होईल. सकाळी उठून लिंबू- मध-पाणी घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते.

लिंबू : लिंबात व्हिटॅमिन C असते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी लिंबू आवश्यक आहे. नियमितपणे थोडेतरी लिंबू आहारात असायलाच हवे. लिंबू-मध-पाणी-आले हे पाचक पावसाळ्यात घेणे हितकारक.

पुदिना : पुदिन्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळेही रोगप्रतिकारशक्ती वाढते. पुदिना, लिंबू एकत्र करून घ्यावे. तसेच सर्दी झाली असेल तर गवती चहा, आले, दालचिनी, लवंग, जवस यांचा काढा करून त्यात पुदिन्याची पाने पण उकळावीत. हा सर्दी- कफ दूर करण्याचा जालीम उपाय आहे.

ज्येष्ठमध : ज्येष्ठमधाच्या काड्यांचा काढा करून घेतले, तर कफापासून लवकर मुक्तता मिळते. घसा खवखवणे, दुखणे, खोकला, कफ, ताप यावर उपाय म्हणून ज्येष्ठमध आणि मध यांचे चाटण थोड्या थोड्या वेळाने घेत जावे.

जवस : याला अळशी असेही म्हणतात. दोन चमचा जवस पाण्यात उकळून त्यात खडीसाखर आणि लवंगही उकळावी. हा काढा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. यामुळे कफ पातळ होतो आणि लवकर आराम मिळतो.