भारतीय युवकांना टाइप टू डायबेटिस जडण्याचा धोका अधिक

नव्या संशोधनातील निष्कर्षांनुसार भारतातील युवा प्रौढांमध्ये टाइप-टू प्रकारातील मधुमेहाचे प्रमाण वाढले

कमरेचा घेर आणि बीएमआयचे प्रमाण अधिक असेलली मुले तसेच युवा प्रौढ वयोगटातील व्यक्तींना टाइप-टू प्रकारातील मधुमेह जडण्याचा धोका अधिक
असल्याचे मद्रास रिसर्च फाउंडेशन आणि डॉ. मोहन्स डायबेटिस स्पेश्यालिटीज
सेंटर, चेन्नई यांनी अलीकडेच हाती घेतलेल्या एका फॉलो अप संशोधनातून
स्पष्ट झाले आहे. स्थूलपणा कमी करणे आणि समूह शिक्षणाच्या माध्यमातून
असंसर्गजन्य आजारांविषयी जागरुकता वाढविणे हा विषय घेऊन ओबेसिटी रिडक्शन अँड अवेअरनेस ऑफ नॉन-कम्युनिकेबल डिझिझेस थ्रू ग्रुप एज्युकेशन (ORANGE )

या नावाने हाती घेण्यात आलेल्या या पाहणीचे निष्कर्ष अमेरिकन जर्नल
डायबेटिस टेक्नॉलॉजी आणि थेरॅप्युटिक्समध्ये प्रसिद्ध करण्यात आले, ज्यात
भारतातील किशोरवयीन मुले व युवा प्रौढांमध्ये टाइप-टू मधुमेहाच्या वाढत्या भाराचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. वर्ष २००८ ते २०११ या दरम्यान ORANGE संशोधन पहाणीचा सुरुवातीचा टप्पा पार पडला. यावेळी चेन्नईतील ६ ते १९ वर्षे वयोगटातील लहान मुले आणि पौंगडावस्थेतील मुले यांच्यातील लठ्ठपणा, ग्लुकोज इनटॉलरन्स आणि मेटॅबोलिक सिंड्रोम यांच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला. सध्याचे संशोधन म्हणजे याच गटाची पुढील १० वर्षांसाठी केलेली फॉलो अप पाहणी असून, डिसग्लायसेमिया, सर्वसामान्य स्वरूपाचे ग्लुकोज टॉलरन्स (NGT) प्री-डायबेटिस आणि डायबेटिसमध्ये विकसित होण्याची नवी प्रकरणे किती प्रमाणात सापडतात हे शोधणे तसेच डिसग्लासेमियाचा विकास म्हणजे हळुहळू डायबेटिस किंवा प्री-डायबेटिसच्या टप्प्यामध्ये पोहोचणे व पुन्हा NGT च्या पातळीवर येण्याच्या शक्यतांचे मूल्यमापन करणे हा या संशोधनाचा हेतू होता. पौगंडावस्थेतील मुले व युवा प्रौढांमध्ये डिसग्लायसेमियाचा धोका दरवर्षी एका टक्क्याने वाढत असल्याचे या संशोधनातून दिसून आले. कमी वयात मधुमेहाचे निदान झालेल्या व्यक्तींना तो उशीरा जडलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक गंभीर स्वरूपाचा मधुमेह असल्याचे तसेच अशा व्यक्तींच्या शरीरातील ग्लायसेमिक नियंत्रण कमी असल्याचे दिसून येते. डिसग्लायसेमियाला कारणीभूत ठरणा-या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे पौगंडावस्थेतील व युवा प्रौढ वयोगटातील व्यक्तींमध्ये वाढलेले वजन आणि लठ्ठपणा यांचा वाढता प्रादुर्भाव. याशिवाय सिस्टॉलिक बीपी किंवा उच्च रक्तदाब आणि वय यांचाही या वयोगटामध्ये डिसग्लायसेमियाची समस्या सुरू होण्याशी संबंध असल्याचे दिसून आले. डिसग्लायसेमिक व्यक्तींमध्ये सिस्टॉलिक हायपरटेन्शन सर्रासपणे आढळून येत असल्याचेही या अभ्यासातून दिसून आले. बीएमआय ही युवा प्रौढांमध्ये मधुमेहमाच्या वाढत्या प्रमाणाची निश्चित खूण असल्याचेही सिद्ध झाले. याचा अर्थ बीएमआय कमी केल्यास समाजामध्ये मधुमेहाचा वाढता प्रादुर्भाव कमी करणे शक्य आहे हेही दिसून आले.

अध्यक्ष आणि प्रमुख डायबेटोलॉजिस्ट डॉ. व्ही मोहन म्हणाले, ”भारतातील
लहान मुले, पौंगडावस्थेतील मुले व युवा प्रौढांमध्ये डायबेटिस आणि
प्री-डायबेटिस या दोन्ही टप्प्यांवरील डिसग्लायसेमियाच्या किती घटना
घडतात याची पुरेशी आकडेवारी उपलब्ध नाही, विशेषत: सामाजिक स्तरावरील
माहितीचा तुटवडा आहे. ORANGE 2 संशोधन पाहणीमधून भारतातील या वयोगटातील लोकसंख्येचा मधुमेहाच्या प्रादुर्भावाचा किती कल आहे याचा रास्त अंदाज बांधला गेला असून युवा वयोगटातील मधुमेहाच्या तपासण्या घेण्याच्या व तो रोखण्यासाठी पावले उचलण्याच्या दृष्टीने धोरण आखण्यास या अभ्यासाची मदत होऊ शकेल. हा शोधनिबंध म्हणजे भारतातील लहान मुले, पौंगडावस्थेतील मुले आणि तरुणांमधील मधुमेहाच्या प्रकरणांची मिळविलेली सामाजिक स्तरावरील पहिली आकडेवारी आहे.”

या पाहणीच्या निष्कर्षांचे विश्लेषण करताना उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय
संचालक डॉ. आर एम अंजना म्हणाल्या, ”संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या
वयोगटामध्ये डायबेटिस किंवा प्री-डायबेटिस विकसित होण्याचे प्रमाण
वर्षाला प्रती १००० व्यक्तींमागे २०.२ इतके आहे असे आम्हाला आढळून आले.
प्री-डायबेटिसच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या व्यक्तींपैकी ७०.६
टक्के व्यक्तींमध्ये ग्लुकोज टॉलरन्सचे प्रमाण सर्वसामान्य पातळीवर आलेले
दिसते तर उरलेल्या २९.४% व्यक्तींमध्ये एकतर मधुमेह विकसित झालेला दिसला किंवा त्या व्यक्ती प्री-डायबेटिसच्या टप्प्यावरच थांबलेल्या दिसल्या.
बीएमआय मधील वाढ आणि कमरेचा घेर हे घटक डायबेटिस किंवा प्री-डायबेटिस स्थिती विकसित होण्याचा धोका वाढविणारे महत्त्वाचे घटक असल्याचेही या पाहणीमधून अधोरेखित झाले.”

डॉ. व्ही. मोहन पुढे म्हणाले, ”कमी वय, कमरेचा घेर, 2-h PG, सिस्टॉलिक
बीपी आणि ट्रायग्लिसराइट्स यांच्या अभ्यासातून व्यक्ती नॉर्मोग्लायसेमियाच्या टप्प्यावर पुन्हा पोहोचण्याच्या शक्यतेचा अंदाज
बांधता येत असल्याचे या पाहणीतून आम्हाला आढळून आले.”