महाशिवरात्रीचा उपवास करताय? तर या चूका टाळा, अन्यथा तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम!

उपवासाच्या पदार्थांमध्ये दाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण दाण्यामध्येही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तसेच पित्ताचा त्रास होऊ शकतो.

  महाशिवरात्र या दिवशी अनेकजण उपवास करतात. पण अनेकदा उपवासासाठी खाल्ले जाणारे पदार्थ आरोग्याला घातक ठरू शकतात. खरतर उपवासाचा अर्थ पोटाला आराम देणं असा आहे. पण उलट उपवासाच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त खाल्ले जाते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी आरोग्यदायी पदार्थ खाण्यावर भर द्यायला हवा. यासाठी काही टीप्स जाणून घ्या.

  उपवासाच्या पदार्थांमध्ये दाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण दाण्यामध्येही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तसेच पित्ताचा त्रास होऊ शकतो.

  • शक्यतो साबूदाणा खिचडी टाळा- आपल्याकडे साधारणपणे साबुदाण्याची खिचडी खाण्याची पद्धत आहे. त्यात जास्त प्रमाणात कार्बोदके असतात त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. साबुदाणा मर्यादेत खाल्ल्यास त्रास होत नाही.
  •  पूर्ण वेळ उपाशी राहून उपवास केल्याने पित्त वाढते. त्यामुळे असे शरीराला त्रास होईल अशापद्धतीने उपवास करणे टाळावे.
  •  मधुमेही लोकांनी देखील उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे कार्बोदके जास्त देणारे पदार्थ असल्याने मधुमेही लोकांनी याचा अती वापर टाळावा.
  •  वजन वाढीच्या दृष्टीकोनातून विचार केला तर चुकीच्या पद्धतीने केलेला उपवास हा वजन वाढवतो. आणि उपासाचे पदार्थ कधीतरी खायला मिळतात म्हणून जर जास्तच खाणे झाले तर पित्त, वजन वाढ होते. त्यामुळे ते टाळणे आवश्यक आहे.

  या पदार्थांचा अन्नात समावेश करा

  फलाहार हा उत्तम आहार आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश करा. ताक, दूध, शहाळं पाणी, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.