मनी मॅनेजमेंट ठरतेय काळाची गरज; ‘या’ गोष्टी महिलांनी समजून घेणे आवश्यक

आपण जर संपूर्ण वेळ घर सांभाळत असाल तर घरात येणाऱ्या अकाली संकट जसे की घरात कोणी अचानक आजारी पडले अथवा आपल्या घराच्या कामासाठी पैशाची गरज लागली तर ऐन वेळी आपल्याकडे पैसे असायला हवे यासाठी...

  भारतीय महिला पैशाचे व्यवस्थापन म्हणजेच “मनी मॅनेजमेंट” मध्ये तरबेज आहे. भारतातील खूपशा महिला अशा आहेत की त्या नोकरी न करता आपले घर अगदी व्यवस्थित सांभाळतात. शहर असो वा ग्रामीण विभाग, तिथे वावरणारी प्रत्येक महिला आपला घरेलू व्यवहार पिढ्यान-पिढ्या चालवत आहेत. घरगुती खर्चासाठी तिला देण्यात आलेल्या पैशातून हुशारीने काही पैसे वाचवत असते; हे ज्ञान भारतीय महिलेला उपजातच असते. पण याच मॅनेजमेंटमध्ये कधीकधी चुकाही घडतात . या चुका कशा आणि यातून आपण कसे सावरू शकतो हे जाणून घेऊया.

  अंकगणित न समजून घेणे
  कित्येकदा अंकगणिताचे सम्यक ज्ञान नसलेल्या महिलांना पैशाच्या बाबतीत फसविले जाते, मग त्यांना गणित येत नाही हे समजताच बाजारातील भाजीवाला असो किंवा अगदी साध्या गोष्टीत त्यांची फसवणूक केली जाते. याच फसवणुकीतून स्वतःला वाचविण्यासाठी आपल्याला अंकगणिताचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे. साधी बेरीज आणि वजाबाकी जरी आपल्याला ज्ञात असली तरी ते बचतीसाठी फायदेशीर ठरते.

  वेगवेगळ्या डील्सना बळी पडणे
  ही गोष्ट महिलांच्या बाबतीत हमखास घडते. घरात उपयुक्त नसलेली गोष्ट फक्त “डिस्काउंट” किंवा “ऑफर”च्या मोहापायी खरेदी केली जाते. अमुक वस्तू स्वस्तात मिळाली हे ठामपणे सांगताना महिला दिसतात. पण या नको असलेल्या गोष्टी खरेदी करून आपण ठरवलेल्या महिन्याच्या “बजेट”ला मात्र धक्का बसतो. बचत करण्यासाठी अतिरिक्त खर्च टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. तरच आपण “मनी मॅनेजमेंट” करण्यात यशस्वी ठरू.

  वित्तीय आयोजन करणे टाळणे  
  घरखर्चासाठी आपण महिन्यांमध्ये किती पैसे खर्च करावे, व त्यातून आपण किती पैशांची बचत करावी याचे मॅनेजमेंट प्रत्येक गृहिणीनेच करावे. मात्र बऱ्याचदा काही गृहिणी कोणत्या न कोणत्या कारणामुळे या पैशाचे मॅनेजमेंट करण्यात अयशस्वी होतात.

  आपण जर संपूर्ण वेळ घर सांभाळत असाल तर घरात येणाऱ्या अकाली संकट जसे की घरात कोणी अचानक आजारी पडले अथवा आपल्या घराच्या कामासाठी पैशाची गरज लागली तर ऐन वेळी आपल्याकडे पैसे असायला हवे यासाठी गृहिणीने पैशाचे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ ज्याप्रकारे आपण बिलांचे पैसे, कामवालीचे पैसे अशे बाजूला काढतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला हातचे पैसे राहण्यासाठी देखील काही रक्कम बाजूला ठेवल्यास गरजेच्या वेळेस ती उपयोगी पडते.

  बचतीच्या ऐवजी खर्चाची यादी बनवणे
  बहुतेकदा महिला त्यांच्या यादी बनवण्याच्या टेक्निकमुळे फसतात. नेहमीच आपण महिन्याभरात किती खर्च केला याचीच यादी बनवली जाते. पण असे न करता आपण महिन्याभरात किती खर्च आहे त्याप्रमाणे आखणी करून त्यातून आपण किती बचत करू शकतो याची यादी बनवली पाहिजे. तरच आपले मनी मॅनेजमेंट पक्के होऊ शकते.