पौष्टिक गव्हाच्या पीठाचे लाडू

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे. या दिवसात गोड पदार्थ काय बनवायचे हा प्रश्नच असतो. घरच्या गृहिणीला सर्वांच्या आवडीनिवडी आणि तब्येत ध्यानात ठेऊनच गोडधोड बनवावं लागत. लाडू हा गोड पदार्थ फार जुना आहे. पण आपण आज ज्या लाडूची पाककृती जाणून घेणार आहोत ती थोडी सुधारित आणि आरोग्यवर्धक असणार आहे. तुम्हाला बनवायला नक्की आवडेल. या लाडूत भरपूर प्रमाणात फायबर आणि नुट्रीशन आहेत. अगदी डायबेटिज असणारेही खाऊ शकतात, जर शुगर कंन्ट्रोलमध्ये असेल तर. जे वजन संतुलित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, ते ही बिनधास्त खाऊ शकतात. सर्व वयाच्या लोकांसाठी अगदी उत्तम मेनू आहे. या पाककृतीमध्ये आपण पाणी, साखर, किंवा साजूक तूप असं काहीही वापरणार नाही. येत्या सणासुदीच्या दिवसात, हे पौष्टिक लाडू बनवून आपल्या प्रियजनांना आनंदी करा. नक्कीच तुम्हला नवीन काहीतरी बनवण्याचे समाधान मिळेल.

साहित्य :-  

1 कप गव्हाचे पिठ
2 कप खजूर (सुमारे 30 खजूर)
1 कप मध
1 कप अक्रोड
1 कप बदाम
2 टिस्पून किशमिश / भोपडा बियाणे / टरबूज बियाणे (आवडीनुसार)
चवीनुसार वेलची पावडर
चवीनुसार जायफळ पावडर
चिमूटभर मीठ

टीप : मोजमाप आपल्या सोयीनुसार कोणत्याही कप किंवा वाटी घ्या, आणि त्यानुसारच सर्व साहित्य घ्या.

कृती :- गव्हाचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या, करपू देऊ नका. तपकिरी रंग येईपर्यंत  भाजून घ्या. मी १ टिस्पून सोजीरवा सुद्धा घालते, त्यानी लाडूवर क्रिस्टल सारख्ये बिंदू दिसतात, तुमच्या आवडीनुसार घाला किंवा नका घालू. पीठ भाजायला ५ ते ७ मिनिट लागतील. नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या. तुपाऐवजी आपण अक्रोड आणि बदामचा वापर करणार आहोत. जे तुपाची आवशक्यता पूर्ण करतील. या दोघातही ओमेगा -३ फॅटी ऍसिड भरपूर आहेत. एक कप अक्रोड आणि बदाम ओव्हन मध्ये सुमारे ५ मिनिटे ३५० f तापमानावर भाजून घ्या. जळू देऊ नका नाहीतर कडू लागतील. अक्रोड आणि बदाम दोघांनाही वेगवेगळे भाजून घ्या. पॅनमध्ये भाजेले तरी चालतील. थोडे गरम असतानाच ग्राइंड करून घ्या.

साखरेऐवजी आपण ओले खजूर आणि मध वापरणार आहोत. जे साखरेची आवशक्यता पूर्ण करतील. पाण्याचा वापर न करता, खजूर ग्रँड करून घ्या. खजुरांना अगदी बारीक आणि सॉफ्ट पेस्ट होई पर्यंत ग्राइंड करून घ्या. यासाठी फूड प्रोसेसर उत्तम आहे. मिक्सरमध्ये जरा कठीण जात, म्हणून खजुरांचे बारीक तुकडे करा आणि मिक्सरमध्ये बारीक करतांना तुमच्या अंदाजानुसार मध टाका, पिसण्यासाठी सोपे जाईल. आता सर्व साहित्य एका बाउलमध्ये चांगले मिक्स करून घ्या किंवा तुम्ही फूड प्रोसेसर मध्ये ही सर्व साहित्य मिक्स करू शकता. त्यानंतर, वेलची पावडर, जायफळ पावडर, मीठ घालावे, किशमिश / भोपडा बियाणे / टरबूज बियाणे हे सर्व टाकून मिक्स करून घ्या. हे मिश्रण अगदी भाकरी च्या ओल्या पिठाप्रमाणे व्हायला हवं. मिश्रण कोरडं वाटत असल्या किंवा, लाडू बांधायला अवघड होत असेल तर मध घालून मिळवून घ्या. तुमच्या गोड स्वादानुसार तुम्ही मधाचा वापर करू शकता. आता झाले तुमचे मिश्रण तयार, हवे त्या आकाराचे लाडू बनून घ्या. लाडूची चव दुसऱ्या दिवशी उत्तम असते. कारण सर्व पदार्थ मुरलेले असतात.