‘या’ लाकडापासून बनतात गगनचुंबी ‘सिक्स’ लगावणाऱ्या बॅट

व्यावसायिक क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारी बॅट फक्त एकाच लाकडापासून तयार होतात. या लाकडाला विलो असे म्हटले जाते.

  क्रिकेट जगातील सर्वांत लोकप्रिय खेळापैकी एक आहे. भारतात तर क्रिकेटचे वेड सांगण्यासाठी कोणतेही उदाहरण देण्याची गरज नाही. क्रिकेटची सुरुवात जरी इंग्रजांनी केली असली व इंग्लंड हिचे मूळ असले, तरी भारतामुळे क्रिकेटला वेगळीच प्रसिद्धी मिळाली, यात दुमत नाही. देशातील बहुतांशी घरात आईवडील आपल्या चिमुकल्यासाठी सर्वांत आधी बॅटची खरेदी करतात, यावरून क्रिकेटच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.

  मुलांना लहानपणी मिळणारे बॅट सामान्यत: प्लास्टिक किंवा साधारण लाकडाचे असतात. परंतु तुमचा आवडीचा क्रिकेटर ज्या बॅटने गगनचुंबी छक्का फटकावतो, ती बॅट कोणत्या लाकडापासून तयार होते व ते लाकूड कुठे आढळते? ज्या बॅटने विराट कोहली व डिविलियर्स मैदान गाजवितात, त्या बॅटचे लाकूड कुठून येते? चल तर बॅटविषयी अशीच काही विशेष

  माहिती जाणून घेऊया…
  विलो नावाच्या लाकडपासून निर्मिती
  व्यावसायिक क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारी बॅट फक्त एकाच लाकडापासून तयार होतात. या लाकडाला विलो असे म्हटले जाते. विलोचेदेखील दोन प्रकार असतात. इंग्लिश विलो व काश्मिरी विलो. मोठमोठे खेळाडू इंग्लिश विलोपासून तयार करण्यात येणाऱ्या बॅटचा वापर करतात. इंग्लिश विलोपासून बनविलेलया बॅट काश्मिरी विलोपासून बनविलेल्या बॅटच्या तुलनेत दमदार व उच्च प्रतीच्या असतात. हेच कारण आहे की, खेळाडू उच्च श्रेणीच्या क्रिकेटमध्ये इंग्लिश विलोपासून बनविलेल्या बॅट वापरतात. याशिवाय इंग्लिश विलो बॅट काश्मिरी विलो बॅटपेक्षा महागदेखील असतात.  या दोन्हीमधील फरक जाणून घेऊ या…

  विलोबाबत काही विशेष
  इंग्लिश आणि काश्मिरी विलोमधील फरक जाणून घेण्यापूर्वी, विलोबाबतच्या काही विशेष गोष्टी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. क्रिकेट बॅट बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विलोला Salix Alba म्हणतात. Salix Alba मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये आढळतात, विशेषत: ब्रिटनमध्ये. याशिवाय ते आशियातील बऱ्याच भागात आढळतात. त्याची झाडे 10 मीटर ते 30 मीटर उंच असतात.

  इंग्लिश आणि काश्मिरी विलोमधील फरक
  काश्मिरी विलोपेक्षा इंग्लिश विलोचा रंग थोडा फिकट असतो. इंग्लिश विलोमध्ये काश्मिरी विलोपेक्षा अधिक ग्रेन असते. जे स्पष्टपणे दिसतात. या व्यतिरिक्त दोघांच्या वजनातही मोठा फरक आहे. काश्मिरी विलोपेक्षा इंग्लिश विलो हलक्या असतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे काश्मिरी विलोमध्ये अधिक घनता आणि ओलावा आहे. या बॅट प्रामुख्याने इंग्लंडमध्ये बनतात, तसेच भारतातही अशा बॅटचे कारखाने आहेत. हे कारखाने इंग्लंडमधून लाकूड आयात करतात आणि भारतातच शानदार बॅट तयार करतात.