स्थूलत्वाशी झगडत आहात? कदाचित तुम्हाला वैद्यकीय उपचारांची गरज असेल; जाणून घ्या सविस्तर

सध्या स्थूलत्वाचे प्रमाण पूर्वी कधी नव्हते एवढे वाढले आहे. वजन घटवण्यासाठी खूप जण झगडत आहेत. वजन घटवण्यात यश आले तरीही, कॅलरीजबाबत सजग व सक्रिय राहूनही काही आठवड्यांत वजन पुन्हा वाढते असा अनुभव अनेकांचा आहे. अतिरिक्त वजन कमी करणे आणि ते प्रमाणात राखणे कशामुळे कठीण आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला वैद्यकशास्त्राकडे वळले पाहिजे.

  मुंबई : भारतात स्थूलत्वामुळे निर्माण होणाऱ्या हायपरटेन्शन आणि मधुमेह यांसारख्या अन्य आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. अनेकांना वाटते की, स्थूलत्वामागील कारण खूपच सोपे व स्पष्ट आहे आणि ते म्हणजे गरजेहून अधिक आहार हे होय. मात्र, शरीरात अधिकाधिक पौंडांची भर पडत जाण्यामागील अनेक कारणांपैकी जीवनशैली हे केवळ एक कारण आहे. स्थूलत्वामागे अनेक घटक असतात, यातील अनेक आपल्या नियंत्रणाबाहेरील असतात. उदाहरणार्थ, आनुवंशिकता, लहानपणापासूनच्या सवयी, वैद्यकीय अवस्था आणि हॉर्मोन्स. स्थूल किंवा लठ्ठ होणे आपल्या हातात नसले आणि जास्तीचे वजन घटवणे कठीण असले, तरी ठरवले तर तुम्ही वजन कमी करू शकता.

  सध्या स्थूलत्वाचे प्रमाण पूर्वी कधी नव्हते एवढे वाढले आहे. वजन घटवण्यासाठी खूप जण झगडत आहेत. वजन घटवण्यात यश आले तरीही, कॅलरीजबाबत सजग व सक्रिय राहूनही काही आठवड्यांत वजन पुन्हा वाढते असा अनुभव अनेकांचा आहे. अतिरिक्त वजन कमी करणे आणि ते प्रमाणात राखणे कशामुळे कठीण आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला वैद्यकशास्त्राकडे वळले पाहिजे. स्थूलत्व हा व्यक्तिमत्त्वातील दोष नाही, तर हा एक जटील स्वरूपाचा चयापचयविषयक आजार आहे असे संशोधकांनी अनेकदा दाखवून दिले आहे. आणि कोणत्याही आजाराप्रमाणे हा आजार बरा करण्यासाठीही आपण जीवनशैलीत बदल करून बरेच काही साध्य करू शकतो.

  स्थूलत्व हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे असे अनेक युक्तिवाद केले जात असले, तरी अनेकांना या समस्येची तीव्रता आणि यामुळे अन्य किती समस्या निर्माण होऊ शकतात ते समजतच नाही. स्थूलत्वामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक अंगांवर, आरोग्यावर, स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. जगात अधिकाधिक लोक अतिरिक्त वजन घेऊन जगत आहे पण आजघडीला त्यातील खूपच कमी जणांना उपचार मिळत आहेत. स्थूलत्वावरील उपचारांमध्ये शस्त्रक्रियात्मक किंवा बिगरशस्त्रक्रियात्मक पद्धतींचा समावेश असू शकतो.

  यामध्ये सांस्कृतिक मुद्देही महत्त्वाचे आहेत. लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आणि आपल्या आहाराच्या सवयींबाबत सजग झाले की या मुद्दयांचे निराकरण होऊ शकते. भारतीय समाजात शिरलेली बाहेर जेवण्याची संस्कृती हे कुपोषणामागील अनेक सांस्कृतिक कारणांपैकी एक आहे पण सांस्कृतिक बदल नेहमीच संथगतीने होतात आणि त्यावर बाहेरून नियंत्रण ठेवणे कठीण असते. याउलट अनेकांसाठी आहाराबाबत निवड करताना खिशाला परवडणे हा घटक महत्त्वाचा असतो. त्यांच्यावर संस्कृतीतील बदलांचा परिणाम फारसा होत नाही. कारण, आपण काय खावे हे निवडण्याची चैन त्यांना करता येत नाही. म्हणून त्यांना जेव्हा विशिष्ट अन्नपदार्थ घेण्याची किंवा जीवनशैलीत बदल करण्याची सूचना केली जाते, तेव्हा त्यांतून वजन कमी होतेच असे नाही. कारण, यातील अनेक बदल त्यांना परवडणारेच नसतात.

  “अनेकांना वजन कमी करणे ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे असे वाटते. त्यामुळे ते त्यात कोणाची मदत मागत नाहीत. स्थूलपणा केवळ जास्त खाण्यामुळे येतो असे नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही एक दीर्घकालीन अवस्था आहे. यात आनुवंशिकता, वातावरण, वर्तन यांचा समावेश आहे आणि म्हणून स्थूलत्वाशी एकट्याने झगडणे कठीण आहे. जीवनशैली, आवडीनिवडी आणि रुग्णाची अवस्था यांना अनुकूल असा सखोल वैद्यकीय कार्यक्रम यासाठी अमलात आणला पाहिजे,” असे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील डायबेटोलॉजिस्ट व एण्डोक्रायनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

  वजन कमी करण्याची परिपूर्ण योजना तयार करण्यासाठी किंवा स्थूलतेवर मात करण्यासाठी यामागील विज्ञान समजून घेतले पाहिजे आणि तुमच्यासाठी योग्य उपचार कोणते हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली पाहिजे. डॉक्टरांनी एकदा तुमच्या अवस्थेचे व्यवस्थित मूल्यमापन केले की, तुम्हाला शस्त्रक्रिया आवश्यक आहे की नाही याचा निर्णय तेच घेऊ शकतात. मुंबईतील एण्डोक्रायनोलॉजिस्ट डॉ. शेहला शेख यांच्या मते, “स्थूलत्व, मधुमेह, हायपरटेन्शन आणि डिस्लिपीडेमिया हे चयापचयाचे आजार आहे. बहुतेक स्थूल व्यक्तींमध्ये या आजारांची संगती दिसून येते.” मधुमेहाप्रमाणे स्थूलत्व हाही एक दीर्घकालीन आजार आहे आणि त्यासाठी आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे आयुष्याच्या मानसिक व शारीरिक दर्जावर परिणाम होतो. “यातील चांगली बाब म्हणजे वजन अगदी कमी प्रमाणात घटले तरी स्थूलत्वाशी निगडित आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात येतात किंवा त्यात सुधारणा होते. आहारातील बदल, शारीरिक हालचालींमध्ये सुधारणा व वर्तनातील बदल यामुळे वजन कमी होऊ शकते. प्रिस्क्रिप्शन (डॉक्टरांनी दिलेली) औषधे आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रिया स्थूलत्वावर उपचार म्हणून सांगितल्या जाऊ शकतात,” असे डॉ. शेख म्हणाल्या.

  मात्र, स्थूलत्वाकडे सामाजिक कलंक असल्यासारखे बघितले जाते. त्यामुळे रुग्ण योग्य मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास बिचकतात. वजनाच्या व्यवस्थापनातील सर्वांत मोठा मुद्दा जीवनशैलीतील बदल हा आहे. मात्र, अनेकांना जीवनशैलीतील बदलांसोबतच वजन कमी करण्यासाठी औषधेही घ्यावी लागू शकतात. दुर्दैवाने सध्या वजन कमी करण्याच्या औषधांमधील पर्याय फारच मर्यादित आहेत.

  स्थूलत्वावर मात करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत

  वर्तनाधारित उपचार, स्थूलत्वरोधक औषधे किंवा बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया ही त्यांची उदाहरणे आहेत. विविध मार्गांनी काम करणाऱ्या वेगवेगळ्या उपचारपद्धतींचा संयोग साधून प्रशिक्षित आरोग्यसेवा देणारे विशिष्ट व्यक्तीसाठी अनुकूल अशी वजन व्यवस्थापन योजना तयार करण्यात मदत करू शकतात. एक व्यवस्थापन धोरण सर्व रुग्णांसाठी काम करणार नाही. कोणत्याही यशस्वी व्यवस्थापन योजनेमध्ये दीर्घकाळ झगडण्याची धोरणे असतात. यामुळे रुग्णाला जास्तीचे वजन घटवणे आणि वजन पुन्हा वाढण्यापासून रोखणे यांत मदत होते. म्हणूनच स्थूल व्यक्तींना खास त्यांच्यासाठी डिझाइन केलेली व्यक्तीनुरूप उपचार योजना आवश्यक असते,” असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

  स्थूलत्वाचे व्यवस्थापन करताना येणारी आणखी एक समस्या म्हणजे आपले शरीर वजन कमी होण्यापासून आपले सक्रियपणे रक्षण करते. शरीराला वजन कमी होत असल्याची संवेदना होते, तेव्हा संरक्षणात्मक यंत्रणा सक्रिय होतात. यामुळे लोकांना जेवल्यानंतर अधिक भूक लागते, समाधान वाटत नाही आणि त्यातून ते आणखी खातात. शिवाय शरीरातील ऊर्जाही कमी वापरली जाते. म्हणूनच पोटात जाणाऱ्या कॅलरीज तेवढ्याच राखूनही अनेकांचे वजन घटल्यानंतर काही आठवड्यांतच पुन्हा वाढते. काही वेळा तर पूर्वीपेक्षा कमी कॅलरीज घेऊनही व्यक्तीचे वजन परत वाढते.

  वजन कमी करणे आणि ते कमी राखणे कठीण आहे, कारण शरीर वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला विशिष्ट असा प्रतिसाद देते. वजन घटल्यानंतर शरीर ते पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करते. अतिरिक्त वजन असलेल्यांसाठी किंवा स्थूल व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या काही उपचारांमध्ये आरोग्यपूर्ण आहार, शारीरिक सक्रियता व नेहमीच्या सवयींमध्ये काही बदल यांद्वारे वजन कमी करण्यावर भर असतो. वजन-व्यवस्थापन कार्यक्रमांचा काही लोकांना, वजन कमी करण्यात आणि कमी झालेले वजन पुन्हा वाढणार नाही याची काळजी घेण्यात, उपयोग होऊ शकतो. स्थूल व्यक्तींपैकी काहीजण आरोग्य सुधारण्यासाठी पुरेसे वजन घटवण्यात किंवा घटलेले वजन पुन्हा वाढू न देण्यात अमसर्थ ठरतात.

  अशा रुग्णांबाबत डॉक्टर अन्य काही उपचारांचा उपयोग करण्याचा विचार करू शकतात. या उपचारांमध्ये वजन कमी करण्याची औषधे, वजन कमी करण्याची उपकरणे किंवा बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेचा समावेश होतो. वजन कमी करण्याच्या योजनेला सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फिजिशिअनशी चर्चा करणे व स्थूलत्वाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असे योग्य उपचार कोणते ते ओळखणे होय.

  या योजनेत अनेक वेगवेगळ्या उपचार पर्यायांचा समावेश असू शकतो. एखादी व्यक्ती वजन व्यवस्थापन प्रवासात पुढे पुढे जाते तेव्हा उपचारांचे वेगवेगळे प्रकार तिच्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणूनच वजन व्यवस्थापन योजना ही तुमच्या गरजांनुसार व्यक्तीनुरूप तयार केली पाहिजे. काही वेळ घेऊन उत्क्रांत झालेली योजना सर्वोत्तम परिणाम देऊ शकते.